Shaktipeeth Highway 
कोल्हापूर

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ‌’ शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला प्रकल्प

आ. सतेज पाटील; ढपला पाडण्यासाठी महामार्ग लादला जात आहे : शेट्टी

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : राज्य शासन महत्त्वाकांक्षी म्हणत असले तरी शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला प्रकल्प आहे, असा घणाघात काँग््रेासचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. कसबा बावडा येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात ते बोलत होते. 55-60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच महामार्ग लादला जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

पाटील म्हणाले, तुमची जमीन, तुमचा सातबारा तुमच्याच नावावर राहिला पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. शक्तिपीठ ही केवळ नकाशावरची रेष नसून तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी रेष आहे. सात-आठ नद्या ओलांडणाऱ्या या महामार्गामुळे पूरस्थिती गंभीर होणार, हजारो एकर सुपीक जमीन उद्ध्वस्त होणार आणि शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वी रद्द करण्याचे आश्वासन देणारे सरकार आता पुन्हा जोरात कामाला लागले आहे. हा शक्तिपीठ नसून कमिशनखोरीचा महामार्ग आहे, असा आरोप करत पाटील म्हणाले, प्रत्येक गावात ग््राामसभा, हरकती आणि जनआंदोलन उभे करा. 22 तारखेपर्यंत प्रांताधिकााऱ्यांकडे हरकती दाखल करा, गावोगावी बैठका घ्या, दबाव किंवा जेलची भीती आम्हाला नाही; पण शेतकऱ्यांची जमीन वाचवण्यासाठी लढा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शेट्टी म्हणाले, हा प्रकल्प शेतकरी, साखर उद्योग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अस्तित्वावर घाला आहे. नाशिक ते अक्कलकोट सहापदरी रस्त्यासाठी केंद्र सरकारला 51 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो तर शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य शासनाला 117 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. 13 जिल्ह्यांतील 21 हजार एकर सुपीक जमीन उद्ध्वस्त करून उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट राबवला जात आहे. सांगली-कोल्हापूरमध्ये महामार्गाच्या भरावामुळे महापुराचा धोका वाढून शेती, गावे व कारखानदारी उद्ध्वस्त होईल, असा इशारा त्यांनी दिला.

श्रीराम सेवा संस्था कार्यालयात या मेळाव्याला रोपास पाणी घालून प्रारंभ झाला. मेळाव्यात गिरीश फोंडे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संपत बापू पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अजित पोवार, डॉ. अतुल दिघे, बाळासाहेब खाडे, बाबासो देवकर, आर. वाय. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार जयंत आसगावकर, राजीव आवळे, ए. वाय. पाटील, कॉ. उदय नारकर, गिरीश फोंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, गोकुळचे संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, कुंभीचे संचालक किशोर पाटील, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, गोपाळराव पाटील, जि.प. सदस्य एकनाथ पाटील, राहुल देसाई, विश्वनाथ ऊर्फ हामु पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, राष्ट्रवादी गटाचे जि.प. सदस्य मनोज फराकटे, यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT