कोल्हापूर : पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा मोठा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पर्यटकांना बसला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथील विमानसेवा विस्कळीत झाली असून सहलीसाठी गेलेले 400 हून अधिक पर्यटक आणि ‘उमरा’ यात्रेसाठी गेलेले भाविक अडकून पडले आहेत.
अ हेवन ट्रॅव्हल्सच्या 44 पर्यटकांचा आज परतीचा प्रवास सुरू होणार होता. पण विमानसेवा रद्द असल्याने दुबईतील हॉटेलमध्येच त्यांची सोय करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 2) दुपारनंतर विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित परतीचा प्रवासाचा मार्ग मोकळा होईल, असे ‘अ हेवन’चे संचालक राजेंद्र बुगडे यांनी सांगितले.
जेद्दाहमध्ये उमरा यात्री अडकले
सोफिया टुर्स अँड ट्रॅव्हल्स (जयसिंगपूर)चे इर्शाद शेख यांनी सांगितले की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 40 उमरा यात्री काल मायदेशी परतणार होते. मात्र, विमान सेवा रद्द झाल्यामुळे त्यांना जेद्दाह येथील हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आहे. दुसरीकडे उमरासाठी निघालेला 40 जणांचा दुसरा ग्रुप विमानसेवा बंद झाल्यामुळे मुंबई विमानतळावरूनच माघारी परतला आहे. नजीकच्या काळात 150 लोकांचे टप्प्याटप्प्याने उमरा नियोजन होते, ते सध्याच्या तणावामुळे रद्द करण्यात आले आहे.
पर्यटक सुखरूप, परतीचा प्रवास लांबला
कोल्हापूरचे 100 ते 110 पर्यटक दुबईत सुरक्षित आहेत. शारजाहमार्गे जॉर्जियाला जाणारे विद्यार्थीही तिथेच थांबले आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून विमानाची तिकिटे व व्हिसाची मुदत वाढवून मिळाली आहे. टीव्हीवर दिसणारी परिस्थिती आणि प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती यात फरक असून पर्यटक सुरक्षित असून बहुतांश पर्यटकांचे स्थळदर्शन सुरू असून काहींनी तिथून व्हिडीओ काढून आपण सुरक्षित असल्याचे कळवले आहे.