कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५ विधानसभा मतदारसंघातून हा महामार्ग जातो. मात्र, सत्ताधारी गटातील ४ आमदारांचा या महामार्गाला विरोध आहे, अशी माहिती काँग्रेस नेते व आमदार सतेज पाटील यांनी आज (दि.१) पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, आमचा विरोध केवळ कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग नको, या साठी नाही. तर हा मार्गच नको, यासाठी आमचा लढा सुरू आहे. विरोध म्हणण्यापेक्षा या महामार्गाची गरजच नाही, असे आम्ही पटवून देत आहे. या महामार्गाविरोधात आम्ही १० हजारांहून अधिक शेतकरी मुंबई येथे १२ मार्चरोजी धडक देणार आहेत, असे ते म्हणाले.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आली आहे. त्याशिवाय छत्रपती शिवरायांबद्दल अवमान केला गेला आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. इतिहास पुसून नवा इतिहास दाखवायचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना अटक करण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.