कोल्हापूर

Krishna-Panchganga rivers : कृष्णा–पंचगंगा दुथडी भरून; जलपर्णीचा पुन्हा विळखा, शेतकरी चिंतेत

पंचगंगा 47 फूट, कृष्णा 21 फूट; राजापूर बंधाऱ्यातून ४२,६२५ क्यूसेक विसर्ग, शिरोळ बंधाऱ्याजवळील रस्ता खचला

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून पंचगंगा नदीची पाणीपातळी 47 फूट, तर कृष्णा नदीची पाणीपातळी 21 फुटांवर पोहोचली आहे. राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकच्या दिशेने ४२ हजार ६२५ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे. मात्र, वाढत्या पाण्यासोबत जलपर्णीचा प्रश्न पुन्हा गंभीर बनल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

तेरवाड बंधाऱ्याजवळ साचलेली जलपर्णी पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे निसटून काही प्रमाणात शिरढोण पुलाकडून वाहून गेली असली, तरी मोठ्या प्रमाणातील जलपर्णी आंबी मळीपर्यंत पुलालाच तुंबून राहिली आहे. त्यामुळे तेरवाड बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात जलपर्णीचे अक्षरशः मैदान तयार झाले असून लगतच्या शेतांमध्येही ती मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

यंदा उन्हाळ्यात नदीतील वाढलेल्या प्रवाहामुळे जलपर्णी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा पाणी वाढल्यानंतर जलपर्णी पुलांवर अडकून नदीकाठच्या शेतांमध्ये विसावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीवरील अनवडी बंधारा पाण्याखाली गेला असून अनवडी बंधाऱ्यापासून आडगाणे मळीपर्यंत संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापले होते. वाढलेल्या प्रवाहामुळे ही जलपर्णी वाहून गेल्याने अनवडी परिसरातील नदीपात्र जलपर्णीमुक्त झाले आहे. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे शिरोळ बंधाऱ्याजवळील रस्ता खचल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या संरचनेवर किती परिणाम झाला आहे, हे पाणी ओसरल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

आठवडाभरापूर्वी पावसाअभावी आणि पाण्याच्या टंचाईच्या भीतीने हवालदिल झालेला शेतकरी आता सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे आनंदित झाला आहे. कृष्णा व पंचगंगा नद्या भरून वाहू लागल्याने खरीप हंगामासाठी दिलासा मिळाला असला, तरी जलपर्णीचा वाढता विळखा आणि नदीकाठच्या पायाभूत सुविधांचे होणारे नुकसान ही प्रशासनासमोरील नवी चिंता बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT