एकनाथ नाईक
कोल्हापूर : शरीरांतर्गत किंवा बाहेर जखम झाली असेल आणि रक्तप्रवाह थांबला नाही. बाहेर रक्ताची गुठळीही तयार झाली नाही, तर त्याला हिमोफिलिया समजले जाते. या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात सुमारे 550 हिमोफिलियाचे रुग्ण आहेत. 8 फॅक्टरचे 350, तर 9 फॅक्टरचे उपचार घेणारे 100 रुग्ण, तर अन्य फॅक्टरचे (रेअर ब्लिडिंग डिसऑर्डर) 100 रुग्ण सीपीआर येथे उपचार घेत असून, मोफत उपचार सुरू आहेत. वर्षभरात 15 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
कशामुळे होतो हा आजार?
आनुवंशिक परिवर्तनामुळे हा आजार होऊ शकतो. ही प्रक्रिया रक्त गोठवणार्या प्रोटिन्सला निर्देशक ठरत असल्याने आजार बळावत जातो. हिमोफिलिया मूलतः पुरुषांचा आनुवंशिक आजार असला, तरी स्त्रियांनादेखील धोका असू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नियमित व्यायामही हवा
गंभीर आजारावेळी शिरांच्या माध्यमातून रक्त देऊन या आजारावर उपचार केले जातात. नियमित व्यायाम आणि गोळ्या न खाताही उपचार होतात. रक्तदान करताना काळजी घ्यावी.
हिमोफिलियाची लक्षणे
गुडघे, कोपर अथवा स्नायूंमध्ये सूज येणे, त्यामध्ये सतत कळ असणे ही लक्षणे आहेत. जखम झाली तर रक्त थांबत नाही. गंभीर स्थितीत मेंदूत रक्तस्राव होतो.
हिमोफिलिया आजाराच्या रुग्णांसाठी सीपीआर येथे मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक वर्षी रुग्णसंख्येत वाढ होत आहे.डॉ. वरुण बाफना, रक्ततज्ज्ञ, सीपीआर