कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा खरेदीसाठी शहरातील सराफ बाजारात प्रचंड गर्दी झाली होती.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Kolhapur Diwali Shopping | दिवाळीत २,४०० कोटींची उलाढाल!

जिल्ह्यात बाजारपेठ बहरली; पाडवा, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ११०० कोटींची खरेदी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दुष्काळाचे सावट आणि महागाई यामुळे दिवाळी हा सर्वात मोठा व्यावसायिक हंगाम कसा जाणार याची बाजारपेठेत धाकधूक असताना यंदाच्या दिवाळीतील उलाढालीने विक्रम केला आहे. सात दिवसांत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. एकंदर दोन हजार ते २,४०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, पाडव्याच्या दिवशी वाहन, सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वेगळा विचार केल्यास ही मोठी खरेदी १,००० ते १,१०० कोटी रुपये झाल्याचा अंदाज बाजारपेठेतील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील सुमारे ८.५५ लाख कुटुंबांनी फराळ, कपडे आणि पूजा साहित्यावर केलेल्या मूलभूत खरेदीला दूध बिलाचा दर फरक, औद्योगिक कामगारांचा बोनस, शासकीय योजनांचा निधी आणि कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘भिशी’ उचलीची मोठी जोड मिळाली. महाद्वार रोड, शाहूपुरी, राजारामपुरीसह इचलकरंजी व तालुका बाजारपेठांत खरेदीचा मोठा उत्साह दिसून आला. या उत्सवी अर्थचक्रामुळे कुंभार, फूल उत्पादक, महिला बचत गट ते हंगामी कामगारांपर्यंत हजारो हातांना थेट रोजगार मिळाला.

दिवाळीपूर्वी ‘६०० कोटींचा बूस्टर’

दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि कामगारांच्या खात्यावर जमा झालेल्या सुमारे ५५० ते ६०० कोटी रुपयांच्या विविध निधीने बाजारपेठेला मोठी उभारी मिळाली. यामध्ये ‘गोकुळ’चा ११७.४२ कोटींचा दूध दरफरक, औद्योगिक व साखर कामगारांचा सुमारे २०० ते २५० कोटींचा बोनस, ‘लाडकी बहीण’ योजनेचे सुमारे ९० कोटी, पीएम किसानचे ८० कोटी आणि दुष्काळी मदतीचे ३७.४५ कोटी रुपये थेट लोकांच्या हातात आले. ऐन सणासुदीत हा पैसा हातात पडल्याने ग्रामीण भागातील खरेदीचा वेग वाढला आणि त्याचा थेट फायदा स्थानिक व्यापारी, कारागीर व छोट्या व्यावसायिकांना झाला.

जिल्ह्याचे दिवाळी खर्चाचे गणित (आकडेवारी)

अंदाजित लोकसंख्या सुमारे ४३.२ लाख

दिवाळी साजरी करणारी कुटुंबे

सुमारे ८.५५ लाख

एकूण बाजारपेठ उलाढाल

२,००० ते २,४०० कोटी

सर्वसाधारण कुटुंबाचा सरासरी

खर्च १२,००० ते १४,००० रुपये

पाडवा खरेदी १,००० ते १,१०० कोटी (मुहूर्तावर अंदाजित उलाढाल)

सोने व चांदी खरेदी ४२०-४८० कोटी

ऑटोमोबाईल (दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर) १५०-१८० कोटी

इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर व मालमत्ता बुकिंग २६०-३०० कोटी

घरे, प्‍लॉट २००-२२० कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT