Gokul Chairman Election | समविचारीचे शशिकांत पाटील-चुयेकर उमेदवार 
कोल्हापूर

Gokul Chairman Election | समविचारीचे शशिकांत पाटील-चुयेकर उमेदवार

महायुतीचे संचालक राहणार अनुपस्‍थित

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळसाठी समविचारीकडून अध्‍यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर उमेदवार असणार आहेत. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे ते अर्ज सादर करणार आहेत. निवडीच्‍या पार्श्वभूमीवर आ. सतेज पाटील यांच्या अजिंक्‍यतारा कार्यालयात सकाळी दहा वाजता कार्यकर्त्यांना उपस्‍थित राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

गोकुळ निवडणूक प्रचारादरम्‍यान समविचारी आघाडीचा जाहीरनामा सादर करतेवेळीच आ. सतेज पाटील यांनी गोकुळमध्‍ये समविचारी आघाडीची सत्ता आल्‍यास शशिकांत पाटील-चुयेकर हे पहिले अध्‍यक्ष होतील, अशी घोषणा केली होती. त्‍यानुसार आ. पाटील यांनी चुयेकर यांना अध्‍यक्षपदी पहिली संधी दिली आहे; मात्र महायुतीचे संचालक आज होणार्‍या अध्‍यक्ष निवड बैठकीला अनुपस्‍थित राहणार असल्‍याने कोरमअभावी अध्‍यक्ष निवड बैठक तहकूब होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे चुयेकर यांची अध्‍यक्ष निवड तांत्रिक अडचणीत सापडली आहे.

तेरा संचालक कोल्‍हापुरात दाखल

गोकुळमध्‍ये दोन्‍ही आघाड्यांकडे काठावरची संचालक संख्‍या असल्‍याने फोडाफोडीच्‍या राजकारणाचा धोका होता. त्‍यामुळे दगाफटका होणार नाही, याची दक्षता दोन्‍ही बाजूंनी घेतली होती. आठवडाभरापूर्वीच समविचारी आघाडीचे सर्व १३ संचालक कर्नाटकमध्‍ये सहलीवर गेले होते. अध्‍यक्ष निवड बैठकीसाठी सर्व १३ संचालक बुधवारी रात्री कोल्‍हापूरमध्‍ये दाखल झाले. शहरातील एका हॉटेलमध्‍ये संचालक थांबून होते.

महायुतीच्‍या भूमिकेकडे समविचारीचे लक्ष

महायुतीमधीलच काही संचालकांनी आ. सतेज पाटील यांच्‍याशी संपर्क साधत अध्‍यक्ष निवडीसाठी आम्‍ही उपस्‍थित राहण्‍यास तयार आहोत. तुम्‍ही आमच्‍या नेत्‍यांशी बोला, असे सांगितले होते. त्‍यानुसार आ. पाटील यांनी मंगळवारी महायुतीच्‍या प्रमुख नेत्‍यांशी फोनवरून संपर्क साधत संचालकांना बैठकीसाठी उपस्‍थित ठेवावे, अध्‍यक्ष निवड प्रक्रिया निर्विघ्‍नपणे पार पाडावी, अशी विनंती केली होती. त्‍यामुळे समविचारी आघाडीचे बुधवारी महायुतीच्‍या भूमिकेकडे लक्ष होते.

चुयेकरांना दुसर्‍यावेळीही प्रतीक्षा?

गोकुळच्‍या मागील निवडणुकीत शेवटच्‍या वर्षाभरासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्‍यक्ष करण्‍याचे त्‍यावेळचे सत्ताधारी आ. सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे यांचे ठरले होते; मात्र ऐनवेळी गोकुळमध्‍ये महायुतीचे राजकारण आले आणि नवीद मुश्रीफ अध्‍यक्ष झाले. त्‍यामुळे चुयेकर यांची संधी हुकली. ही सल भरून काढण्‍यासाठी आ. सतेज पाटील यांनी आता चुयेकर यांच्‍या नावाची अध्‍यक्षपदासाठी घोषणा केली; मात्र समविचारीकडे अध्‍यक्ष निवड बैठकीसाठी कोरम पूर्ण करणारी संचालक संख्‍या नाही, तर महायुतीचे संचालक बैठकीला अनुपस्‍थित राहणार असल्‍याने चुयेकर यांना दुसर्‍यावेळीही अध्‍यक्षपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महायुतीचे संचालक राहणार अनुपस्‍थित

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी आज होणार्‍या बैठकीला महायुतीचे संचालक अनुपस्‍थित राहणार आहेत. अध्यक्ष निवडीबाबत जिल्‍ह्यातील महायुतीचे नेते, संचालक यांची बुधवारी दुपारी गोव्‍यात बैठक झाली. बैठकीमध्‍ये रणनीती ठरविण्‍यात आली. निवडीवरून महायुतीच्‍या प्रमुख नेत्‍यांची मुंबई-गोवा-मुंबई अशी वारी सुरू होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत खलबते सुरू होती. अध्यक्ष निवडीसाठीचा बी प्‍लॅनही महायुतीने तयार ठेवला आहे.

गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून महायुतीत मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू आहेत. अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी होणारी बैठक कोरमअभावी तहकूब करायची आणि तीन नोव्‍हेंबरला होणार्‍या मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत शासननियुक्‍त संचालकांचा मतदानाचा अधिकार देण्‍याबाबत मंजुरी घेत दिवाळीनंतर अध्यक्ष निवडीची पुढील बैठक घ्‍यायची, अशी रणनीती महायुतीची असल्‍याचे समजते. गोव्‍यात झालेल्‍या बैठकीमध्‍ये याबाबतच चर्चा झाली.

काही नेते, संचालकांचा विरोध

अध्यक्ष निवडीच्या बैठकीला अनुपस्‍थित राहायचे, शासन नियुक्‍त संचालकांना मतदानाचा अधिकार द्यायचा याला महायुतीचे काही नेते, संचालक यांनी विरोध केला आहे. ही बाब कायदेशीर पातळीवर टिकणार नसल्‍याचेही त्यांनी सांगितले; पण एका मंत्र्याने मुख्‍यमंत्र्यांचे नाव पुढे करत याबाबत आग्रह धरल्‍याचे समजते. त्‍यामुळे तूर्तास तरी सर्व नेते, संचालक यांनी या प्रक्रियेबाबत सकारात्‍मकता दर्शवल्‍याची चर्चा आहे.

मंगळवापासूनच महायुतीत हालचाली

गोकुळमध्‍ये चार शासननियुक्‍त संचालकांची नियुक्‍ती करून त्‍यांना मतदानाचा अधिकार देण्‍याबाबत मंगळवारपासूनच महायुतीत हालचाली सुरू झाल्‍या आहेत. मंगळवारी मंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे यांनी याबाबत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर आ. कोरे मंगळवारी रात्रीच गोव्‍यात दाखल झाले, तर रात्री उशिरापर्यंत मंत्री मुश्रीफ मुंबईत थांबून होते. बुधवारी सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. चंद्रदीप नरके, माजी खा. संजय मंडलिक गोव्‍यात दाखल झाले. संचालकांसोबत बैठक घेत नेते पुन्‍हा खास विमानाने कोल्‍हापूर विमानतळावर आले. येथून मंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ मुंबईला रवाना झाल्‍याचे समजते.

संचालकांसाठी खास विमान तयार

अध्यक्ष निवड बैठकीला अनुपस्‍थित राहण्‍याचे महायुतीचे ठरले असले, तरी रात्री उशिरापर्यत याबाबत मुंबईत खलबते सुरू होती. बुधवारी रात्रीच महायुतीचे संचालक कोल्‍हापूरमध्‍ये दाखल होणार होते; मात्र याबाबत ठोस निर्णय होत नसल्‍याने ते गोव्‍यात थांबून राहिले. गुरुवारी बैठकीला उपस्‍थित राहण्‍याबाबत निर्णय झाल्‍यास सकाळी नऊ वाजता सर्व संचालक खास विमानाने कोल्‍हापूरकडे रवाना होतील. साधारणत: पावणे दहा वाजण्‍याच्‍या सुमारास ते कोल्‍हापूर विमानतळावर दाखल होतील. विमानतळ परिसरातीलच एका फार्म हाऊसवर त्‍यांची थांबण्‍याची व्‍यवस्‍थादेखील केली आहे. तेथून ते बैठकीसाठी उपस्‍थित राहतील, असेही नियोजन केले असल्‍याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT