Kolhapur Rainfall | परतीचा अन् अवकाळीचाही पाऊस आला नाही धावून!  File Photo
कोल्हापूर

Kolhapur Rainfall | परतीचा अन् अवकाळीचाही पाऊस आला नाही धावून!

ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या केवळ २० टक्केच बरसला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात अवकाळी आणि परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या २८ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ २०.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरी १०२.७ मि.मी. पाऊस होतो. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा दिलासादायक असला, तरी राधानगरी, तुळशी, वारणा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव धरणांत गतवर्षीपेक्षा काही प्रमाणात कमी पाणीसाठा आहे. आगामी काळात ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमान वाढीमुळे पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. यामुळे पाण्याचा काटकसरीनेच वापर करण्याची गरज आहे.

जून ते सप्टेंबर या मुख्य पावसाळी हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी १,७३३.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र या कालावधीत केवळ ८९८.८ मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच सरासरीच्या अवघा ५१.९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्येही पावसाने ओढ दिली आहे. परतीच्या पावसाकडून अपेक्षा असतानाच त्यानेही निराशा केल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे.

आगामी काळात ‘अल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढू शकते. तापमान वाढणार असल्याने जलाशयांमधील बाष्पीभवनाचा वेगही वाढण्याची भीती आहे. सध्या धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असला, तरी पावसाची तूट आणि आगामी काळातील वाढती गरज लक्षात घेऊन पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनो उपलब्ध पाण्याचा जपून वापर करा आणि पाण्याची बचत करा.

एकाही तालुक्यात दमदार बरसला नाही परतीचा पाऊस

बारापैकी एकाही तालुक्यात ऑक्टोबरच्या सरासरीइतका पाऊस झालेला नाही. कागल तालुक्यात सर्वाधिक ३०.५ मिलिमीटर, तर गडहिंग्लजमध्ये सर्वात कमी ७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरीत ३४.१, भुदरगडमध्ये २१.६, शाहूवाडीत २४.६, पन्हाळ्यात ११.२, करवीरमध्ये ४०.६, हातकणंगलेत १२.२, शिरोळमध्ये ६.५, आजऱ्यात ६.३, चंदगडमध्ये १३.९ आणि भुदरगडमध्ये २१.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गगनबाड्यात ऑक्टोबरमध्ये २०६.३ मि.मी. सरासरी पाऊस होतो. यंदा केवळ ४४.६ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची ही स्थिती पाहता परतीच्या पावसानेही जिल्ह्याला हुलकावणी दिल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT