Monsoon Rainfall  Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Rainfall | कोल्हापुरात जूनपेक्षा जुलैच्या अवघ्या पाच दिवसांतच ३७ टक्के अधिक पाऊस

पाच दिवसांत ६२५ मि.मी. बरसला अन्‌ कोरडी पंचगंगा पात्राबाहेर पडली

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : जूनभर पावसाने पाठ फिरवल्याने भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभा असलेला कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या पाच दिवसांच्या मुसळधार पावसाने संपूर्ण चित्रच बदलून टाकले आहे. जून महिनाभरात झालेल्या पावसापेक्षा जास्त पाऊस केवळ १ ते ५ जुलै या कालावधीत कोसळल्याने नद्या, धरणे आणि ओढे तुडुंब भरले आहेत. संपूर्ण जून महिन्यात जिल्ह्यातील १२ तालुक्यांत सरासरी ११३.६ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, केवळ गेल्या पाच दिवसांत १५५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत जुलै अवघ्या पाच दिवसांमध्ये ३७ टक्के अधिक पाऊस झाला.

या कालावधीत तालुकानिहाय सरासरी १५५.८ मि.मी. पाऊस झाला. धरण क्षेत्रातही पावसाने विक्रमी मुसंडी मारली आहे. १ जून ते ५ जुलैदरम्यान जिल्ह्यातील १७ धरण क्षेत्रांत एकूण ७३० मि.मी. पावसाची नोंद झाली. यापैकी जूनअखेरपर्यंत ३६० मि.मी. पाऊस झाला होता; तर केवळ १ ते ५ जुलै या पाच दिवसांतच ४७० मि.मी.हून अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे जूनमध्ये तळ गाठलेले जलसाठे आता वेगाने भरू लागले असून, अनेक धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

दहा दिवसांपूर्वी होती दुष्काळाची भीती

पंचगंगा नदीपात्रातील मंदिरे २५ जूनपर्यंत स्पष्ट दिसत होती. पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई होण्याची भीती निर्माण झाली होती. पिण्यास पाणी मिळते की नाही, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, जुलैच्या पहिल्याच दिवसापासून पावसाचा जोर प्रचंड वाढत गेला आणि पाच दिवसांतच परिस्थितीने नाट्यमय कलाटणी घेतली. नदी पात्राबाहेर आली असून, जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी ३० फूट २ इंचांवर पोहोचून नदी पात्राबाहेर वाहू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT