Kolhapur Rainfall | ऑगस्टमध्येही रुसला; ४२ टक्केच बरसला File Photo
कोल्हापूर

Kolhapur Rainfall | ऑगस्टमध्येही रुसला; ४२ टक्केच बरसला

जूनपासून ५५.२४ टक्केच पाऊस; सरासरी गाठण्यास ३० दिवसांत ८८५.६ मि.मी.ची गरज

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यावर यंदा पाऊस रुसला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ ४२.३ टक्केच पाऊस झाला. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत फक्त ५५.२४ टक्के पाऊस बरसल्याने आता वार्षिक सरासरी गाठण्यासाठी उर्वरित सप्टेंबरच्या ३० दिवसांत तब्बल ८८५.६ मि.मी. पावसाची गरज आहे.

‘अल निनो’चा परिणाम जिल्ह्यात पहिल्याच महिन्यात दिसला. जूनमध्‍ये तब्बल ६८.८ टक्के पावसाची तूट राहिली. सरासरीच्या केवळ ३१.२ टक्के पाऊस झाला. जुलैला मात्र पावसाने काही काळ जोरदार कमबॅक केले. या महिन्यात सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला. यामुळे जून ते जुलै या महिन्यात कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण ६१.२६ टक्क्यांपर्यंत गेले. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. या कालावधीत ४८५.७ मि.मी. पाऊस होतो. यावर्षी तो केवळ २०५.३ मि.मी. इतका झाला. हे प्रमाण केवळ ४२.३ टक्केच आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत केवळ ८४७.५ मि.मी.पाऊस झाला. वार्षिक सरासरी गाठण्यासाठी उर्वरित ३० दिवसांत तब्बल ८८५.६ मि.मी. पाऊस झाला पाहिजे. मात्र, या महिन्यात इतका पाऊस होण्याची शक्यता कमीच आहे.

दोन तालुक्यांनीच गाठली सरासरी

जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी केवळ दोनच तालुक्यांनी सरासरी गाठली. शिरोळ तालुक्यात सरासरीच्या १०९.१७ टक्के, कागलमध्ये १२०.०२ टक्के पाऊस झाला. राधानगरी, चंदगड या तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही.

सर्वाधिक नोंदीच्या तालुक्यांत पाऊस कमी

गगनबावडा, चंदगड आणि राधानगरी या जास्त पाऊस पडणाऱ्या तालुक्यांत तीन महिन्यांत पावसाने सरासरी गाठली नाही. राधानगरी तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली. या तालुक्यात सरासरीच्या ४०.६४ टक्केच पाऊस झाला आहे. गगनबावड्यात यावर्षी केवळ ६३.२५ टक्के पाऊस झाला. चंदगड तालुक्यात ४१.५९ टक्के पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT