विकास कांबळे
कोल्हापूर : पर्यावरणाचे रक्षण करत प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ‘ग्रीन डे’ ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांचा या उपक्रमाध्ये सहभाग अपेक्षित असून त्यासाठी त्याचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना सायकलचा वापर करणे, पायी चालणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. याशिवाय, ‘नो व्हेईकल डे’, ‘नो मोबाईल डे’ आणि शासकीय कार्यालयांमध्ये ‘ग्रीन ऑफिस’ (कागदविरहित कामकाज) यांसारख्या संकल्पना राबवून इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे केवळ इंधन बचत आणि प्रदूषणात घट होणार नाही, तर नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना वाढीस लागून आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा अवलंब करण्यास चालना मिळेल. या व्यापक बदलासाठी शासकीय यंत्रणेसोबतच नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गावागावांत स्वच्छता मोहीम
आणि पर्यावरण रॅलीचे आयोजन
शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध,
चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा
जिल्हाभर मोठ्या प्रमाणात
वृक्षारोपण कार्यक्रम
शाळांमार्फत घरोघरी जाऊन
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे