कोल्हापूर

भराव नको… कमानी पूल उभारा: शाहूवाडीत शाळी, कडवी काठावरील गावांना पुराचा धोका

अविनाश सुतार

सरूड : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे सद्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातील ससेगांव, कोपार्डे, पेरिड येथे शाळी आणि कडवी नद्यांच्या परिसरात सरसकट मुरूम मातीचा भराव (मलमा) टाकून प्रस्तावित रस्त्याचे काम सुरू आहे. सदरचे काम थांबवून त्याठिकाणी पिलर कमानी पूल बांधावेत, जेणेकरून नद्यांचे पाणी वाहते राहील याची दक्षता घेणे उचित ठरेल. आणि संभाव्य पुराचा धोका कमी करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे. अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाहूवाडी तालुका पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दिले आहे.

आधीच पावसाळ्यात या परिसरसह मलकापूर शहराला पुराचा मोठा फटका बसतो. त्यात वाढीव भरावामुळे वाहत्या पाण्याला अटकाव होऊन पुराचा धोका अधिकच वाढणार आहे. शिवाय परिसरातील येळाणे, कोपार्डे, पेरिड, येलूर, गावठाण, कडवे, निळे, करुंगले, वीरवाडी, खोतवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकांचे अपरिमीत नुकसान होणार आहे.

यासाठी नद्यांच्या परिसरात सुरू असणारे सरसकट मुरूम मातीच्या भरावाचे काम थांबवून त्याठिकाणी पिलर कमानी पूल बांधावे, जेणेकरून नद्यांचे पाणी वाहते राहील याची दक्षता घेणे उचित ठरेल. आणि संभाव्य पुराचा धोका कमी होऊन शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान टळेल, अशी विनंती वजा आर्जव या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, गणेश महाजन, भैय्या थोरात, अजित साळुंखे, राजू केसरे, भारत पाटील, जयसिंग पाटील आदींच्यासह्या आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT