Kolhapur Kerli Floodwater
कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली या दरम्यान कासारी नदीच्या पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जोतीबामार्गे वाघबीळकडे वळविण्यात आली आहे. आज (दि.२०) सकाळी एकेरी वाहतूक सुरू होती. परंतु दुपारनंतर पाणी पातळी वाढून दीड फुटावर पोहोचली . त्यामळे हा महामार्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
दरम्यान, जोतीबा फाटा येथे बॅरिकेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. केर्ली गावातून जाणारी वाहतूक जोतिबा मार्गे वळवण्यात आली आहे. कोल्हापूर ते पन्हाळा जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः कामानिमित्त किंवा शैक्षणिक कारणासाठी प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी यांना लांबचा प्रवास करावा लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पण धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पंचगंगा नदीने आज पहाटे इशारा पातळी ओलांडली. दुपारी १ वाजता पंचगंगा नदीची राजाराज बंधारा पाणी पातळी ४० फूट ५ इंचावर होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट समजली जाते. जिल्ह्यातील एकूण ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे धरणाच्या एकूण स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले आहेत. सध्या ३, ६ आणि ७ क्रमाकाचे दरवाजे खुले आहेत.