Rashivade illegal gambling case
राशिवडे : पिंपरी कॉर्नर परिसरात गुप्तपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकासह राधानगरी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पाच ठिकाणी छापे टाकून रोख ६ हजार रुपये जप्त करण्यात आले असून, दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर तिघेजण फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी कॉर्नरजवळ बेकायदेशीर मटका व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सकाळी छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान दुसऱ्या मजल्यावरून एकाने थेट उडी मारून पळ काढला. यावेळी पोलिसांनी कुलूपबंद अड्ड्याचे कुलूप तोडून छापा टाकण्यात आला.
या कारवाईत संजय पवार, बळवंत गोंगाणे, रविंद्र पाटील, सदाशिव पाटील आणि शंकर नकाते या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघे फरारी आहेत. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.