Air Pollution Pudhari File Photo
कोल्हापूर

Air Pollution : स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोल्हापूर तळाला

‘एनकॅप’अंतर्गत ३०.४४ कोटींचा निधी; २४.०२ कोटी खर्च, तरीही शहराची हवा राज्यात सर्वाधिक प्रदूषित

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या हवेला आता प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ मध्ये महाराष्ट्रातील शहरांमध्ये कोल्हापूर सर्वात तळाला गेले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या राष्ट्रीय क्रमवारीत कोल्हापूरला केवळ १४५.५ गुणांसह ३३ वा क्रमांक मिळाला. महाराष्ट्रातील या सर्वेक्षणात सहभागी शहरांची गुणांच्या आधारे तुलना केली असता कोल्हापूरची कामगिरी सर्वात खराब ठरते.

खराब रस्ते, रस्त्यांवरून उडणारी धूळ, दिशाहीन विकासामुळे झालेली रस्त्यांची दुरवस्था आणि वर्षानुवर्षे आहे त्याच लांबी, रुंदीच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची कित्येक पटींनी वाढलेली संख्या यामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता ढासळत आहे. विशेष म्हणजे, हवा स्वच्छ करण्यासाठी पैशांची कमतरता असल्याचे कारणही देता येणार नाही. केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत कोल्हापूरला ३०.४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून त्यापैकी २४.०२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. म्हणजेच उपलब्ध निधीपैकी जवळपास ७९ टक्के रक्कम खर्च झाली. तरीही धुळीचे लोट कायम आणि हवा प्रदूषितच असेल तर हा निधी नेमका कुठे आणि कशावर खर्च झाला, त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या पार्टिक्युलेट मॅटर १० पातळीत २०१८ च्या तुलनेत घट झाली असली तरी ती अद्याप मानकापेक्षा वर आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२५-२६ मध्ये पीएम १० ची पातळी सुमारे ७५ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर आहे तर दर्शविलेल्या मानकाची मर्यादा ६० मायक्रोग्रॅम आहे. म्हणजे निधी, खर्च आणि योजनांचा मोठा गाजावाजा असतानाही कोल्हापूरकरांना शुद्ध हवा मिळालेली नाही; उलट स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या आरशात शहराची कामगिरी महाराष्ट्रात तळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूरपेक्षा पुढे असलेली १६ शहरे

अमरावती १९४, लातूर १८८.५, ठाणे १८७, नवी मुंबई १८४, नागपूर १८३.८, पुणे १८३, उल्हासनगर १७९.५, सोलापूर १७८.५, छत्रपती संभाजीनगर १७८, सांगली १६८.२, जळगाव १६५.६, अकोला १६५, मुंबई १६०.८, नाशिक १६०.२, चंद्रपूर १५८.५ आणि बदलापूर १५८ गुण. कोल्हापूरला केवळ १४५.५ गुण मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील या

१७ शहरांच्या गुणांची तुलना केल्यास कोल्हापूर शेवटच्या स्थानी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT