शिवराज सावंत
फुलेवाडी : ऐतिहासिक रंकाळा तलावात चारी बाजूंनी सांडपाणी मिसळत असल्यामुळे अक्षरशः गटारगंगा झाली आहे. सध्या परताळ्याच्या बाजूने काळेकुट्ट पाणी थेट रंकाळ्यात मिसळत असल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेचे अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्यामुळे जलचरांना फटका बसण्याची शक्यता आहे.
रंकाळा तलावासाठी एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असताना तलावातील अंतर्गत समस्या व पाणी प्रदूषण याकडे पाहायला कोणालाही वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रंकाळ्यात चारी बाजूंनी सांडपाणी मिसळत आहे. श्याम सोसायटी, साने गुरुजी परिसरातून येणारे सांडपाणी, देशमुख हॉल नाला यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असतानाच सध्या मागील बाजूस असणाऱ्या परताळ्यातून मोठ्या प्रमाणात काळे सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत आहे.
मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असून फेसाळलेली पाणी थेट रंकाळ्यात मिसळत आहे. यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. यापूर्वी अनेकवेळा पाणी प्रदूषणामुळे मासे, कासव, अन्य जलचर प्राणी मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांच्या वेळी प्रदूषण मंडळाचे अधिकारी रंकाळ्यातील पाण्याचे नमुने घेऊन जातात. पुढे या नमुन्यांचा रिपोर्ट कोणालाही समजत नाही.