शाहूवाडीत १४१ मालमत्तांची पडझड Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Rain Updates | शाहूवाडीत १४१ मालमत्तांची पडझड ; ६३ लाखांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

सरूड : शाहूवाडी तालुक्यात धुवांधार अतिवृष्टी सुरू आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात उखळू, माण, सरूड, सुपात्रे, बांबवडे, शिवारे, सावे, उदगिरी, वाकोली, वाडीचरण, चरण, जावळी, सोनूर्ले, नांदारी, गजापूर, वडगांव, साळशी, ऐनवाडी आदी ठिकाणच्या गेल्या दोन दिवसात ३३ मिळकतींची पडझड झाली आहे.

तालुक्यात अतिवृष्टी

शाहूवाडी तालुक्यात धुवांधार अतिवृष्टी सुरू आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात ३३ मिळकतींची पडझड झाली आहे. यामुळे संबंधित मिळकतधारकांचे सुमारे रुपये १३ लाख ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आजवर १४१ खाजगी तर ३ सार्वजनिक मालमत्तांचे मिळून रुपये ६३ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली. काही ठिकाणी किरकोळ दुखापतीची घटना वगळता कुठेही गंभीर इजा अथवा जिवीतहानी झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

जनजीवन विस्कळीत

दरम्यान, हवामान खात्याच्या स्वयंचलित पर्जन्यमापकावरील नोंदीनुसार तालुक्यात शनिवारी सकाळी ८ पर्यंतच्या चोवीस तासात सरासरी ७४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर यंदाच्या तांत्रिक वर्षात एकूण १२०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये भेडसगांव ७७१.७ (४४.८) मिमी, सरूड ७६६.१ (५२.८) मिमी, बांबवडे ८५१.१ (५७.३) मिमी, मलकापूर १४०९.६ (९०.५) मिमी, करंजफेण ११८७.६ (७२.८) मिमी, आंबा २२६०.१ (१२५.८) मिमी असा यंदा सर्कलनिहाय पाऊस बरसला आहे.

आकडेवारीवर नजर टाकल्यास पूर्व भागात झालेल्या पावसाच्या (सरासरी ७९६.३) तुलनेत तर पश्चिम भागात दुपटीहून (सरासरी १६१९.१) अधिक पाऊस झाल्याचे दिसून येते. सद्या कडवी, वारणा, कासारी, कानसा या सर्वच नद्यांच्या परिसरात उद्भलेल्या महापूर परिस्थितीत संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील पावसाचा वेग शनिवारी (दि.२७) दुपारनंतर काहीअंशी मंदावल्याचे चित्र असून नद्यांच्या पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत होती. पावसाची विश्रांती कायम राहिल्यास जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

पडझडीमुळे नुकसान

कमळाबाई हरी जाधव (सरुड, १ लाख ५०,०००), महेश रमेश चव्हाण (सरुड, १ लाख ४०,०००), तानाजी राजाराम डाकवे (सरुड, रु. २ लाख ५०, ०००), भाऊ जोती कांबके (सरूड, रु. ७०,०००), आक्काताई डाकवे (शिवारे, रु. ४०,०००), श्रीपती आबा कांबळे (सुपात्रे, रु. ५०,०००), हरी मारुती हांडे (सुपात्रे, रु. ४०,०००), समाज मंदिर (उदगिरी-बौद्धवाडा, रु. २ लाख ५०,०००), वालुबाई नामदेव फिरके (वाकोली, रु.४०,०००), अशोक नारायण पाटील (उदगिरी, रु. ५०,०००), संजय धोंडिबा लाड (वाडीचरण, रु. ३०,०००), पांडुरंग तुकाराम पाटील (चरण, रु. ३०,०००), राजाराम म्हेत्तर (बर्की, ५०,०००), भानुदास लोकरे (उखळू, ४०,०००) आदी मालमत्ता धारकांचे पडझडीमुळे नुकसान झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT