नागाव : करवीर तालुक्यातील शिये येथील जैन गल्लीत रविवारी रात्री बाराच्या सुमारास मुसळधार पावसामुळे एका राहत्या घराची भिंत कोसळली.या दुर्दैवी घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, घराबाहेर उभ्या असलेल्या दोन मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र दादासो पाटील यांचे शिये गावात दुमजली सिमेंट पत्र्याचे घर आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घराच्या दक्षिणेकडील भिंत कमकुवत झाली होती. रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ही भिंत अचानक पत्त्यासारखी कोसळली. परिसरात मोठा आवाज झाला, ज्यामुळे नागरिक तातडीने घटनास्थळी जमा झाले.
या घरात एक भाडेकरू कुटुंब वास्तव्यास असून, घटनेच्या वेळी त्या कुटुंबातील महिला आणि मुलगा घराच्या आत झोपले होते. सुदैवाने, भिंत रस्त्याच्या बाजूला पडल्याने आतील रहिवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, भिंतीचे दगड आणि विटा रस्त्यावर उभ्या असलेल्या रमजान पठाण व आसिफ पठाण यांच्या दोन मोटार सायकलवरही पडल्याने त्यांचे मोठं नुकसान झाले आहे..