राधानगरी: धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून, आज पहाटे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या ११,५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी चार दरवाजे उघडण्यात आले होते, तर आज पहाटे उर्वरित तीन दरवाजे आपोआप उघडले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे खुले झाले आहेत. दरम्यान, भोगावती नदीवरील पडळी आणि पिरळ पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदीपात्रातील पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.