Kolhapur Rain : शिरोली परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा 
कोल्हापूर

Kolhapur Rain : शिरोली परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

नागाव : शिरोली एमआयडीसीसह पुलाची शिरोली, नागाव, हालोंडी, मौजे वडगाव आणि हेरले परिसराला बुधवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गासह सेवा रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.

गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने हाताशी आलेली पिके धोक्यात आली होती. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परिसरातील ओढे आणि नाल्यांनाही पाणी आले.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पाणी निचरा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सांगली फाटा, एमआयडीसी पहिला फाटा येथील महामार्ग व सेवा रस्त्यांवर तसेच मयूर फाट्याकडील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाच्या काळात वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे महामार्गावरील पाणी निचरा यंत्रणा आणि रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT