Panchaganga River kolhapur news update
कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी आज (दि.२४) पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे. कोल्हापूर शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वेगाने वाढ असून सध्या ती २९.११ फुटांवर वाहत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून सुद्धा पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे. राजाराम बंधारा पाणी पातळी २९.११ फुट असून, आज दुपारपर्यंत २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुट, तर धोका पातळी ४३ फुट आहे.
अणदूर ल.पा. तलाव (ता. गगनबावडा) आज (दि.२४) सकाळी १० वाजता 100% भरला आहे. कुंभी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना येणेस देखील बंदी घालण्यात आली आहे.