Krishna Panchganga river water level rise
कुरूंदवाड : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोयना आणि राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. याचा थेट परिणाम म्हणून कृष्णा आणि पंचगंगा या दोन प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पातळी २४ फूट ८ इंच, तर पंचगंगा नदीची पातळी ३४ फूट इतकी झाली आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे दीड फूटाने उघडून, विद्युतगृहासह एकूण २१,३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
राजाराम बंधाऱ्यातून २८,४४२ क्युसेक आणि राजापूर बंधाऱ्यातून तब्बल ५४,००० क्युसेक पाणी कर्नाटक राज्यात सोडले जात आहे. त्यामुळे राजापूर, तेरवाड, शिरोळ येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी तिसऱ्यांदा तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नदीकाठच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणीपातळी कमी झाल्याने मच्छीमार बांधवांनी नदीपात्रात जाळे लावली होती, मात्र अचानक वाढलेल्या पाण्यामुळे अनेकांची जाळी वाहून गेली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडून ११,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणे १०० टक्के भरली असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.