कोल्हापूर : मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्याची महापुराची चिंता वाढवली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आजअखेर (दि. 12) पावसाने दडी मारल्याने यंदा सरासरी तरी गाठतो की नाही, याची चिंता निर्माण झाली आहे. दि. 12 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या अवघा 62.94 टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या आजच्याच दिवसअखेर कालावधीच्या तुलनेत 27.62 टक्के पावसाची तूट आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात मान्सूनपूर्व चांगलाच बरसला. मे महिन्यात तब्बल 241 मि.मी. पाऊस झाला होता. यामुळे धरणांतील पाणीसाठेही समाधानकारक झाले. जून महिन्यातही पावसाचा जोर राहिला. परिणामी, जिल्ह्यातील नद्यांना पंचगंगेने पूर आला. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला. यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला आहे. अधूनमधून कोसळणारी सर वगळता सर्वत्र पावसाची उघडीप आहे.
जिल्ह्यात 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा कालावधी सर्वाधिक पावसाचा मानला जातो. जिल्ह्यात 2019 आणि 2021 साली महापूर आला. यावेळी 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत अधिक पाऊस झाला. यावर्षी मात्र या कालावधीत मोठा पाऊस झाला नाही. जिल्ह्यात दि. 1 ते 12 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 188.1 मि.मी. पाऊस पडतो. यावर्षी मात्र याच कालावधीत केवळ 35.5 मि.मी. इतकाच पाऊस झाला. हे प्रमाण ऑगस्टच्या सरासरीच्या केवळ 18.8 टक्के आहे. जिल्ह्यात 1 जून ते 12 ऑगस्ट कालावधीत सरासरी 1,236.5 मि.मी. पाऊस पडतो. गतवर्षी याच कालावधीत 1,119.8 मि.मी. म्हणजे सरासरीच्या 90.56 टक्के पाऊस झाला. यावर्षी मात्र 778.3 मि.मी. म्हणजेच सरासरीच्या 62.94 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 28 टक्के कमी पाऊस झाला आहे.