Accident Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Accident | दहावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्याच्या दुचाकीला गव्याची धडक; जखमी अवस्थेतच दिला पेपर

राधानगरी तालुक्यातील आकनूर -खिंडी व्हरवडे मार्गावर घटना

पुढारी वृत्तसेवा

Radhanagari Student Accident Gaur Collision

सरवडे: आकनूर -खिंडी व्हरवडे (ता राधानगरी) दरम्यानच्या मार्गावर दहावीच्या परीक्षेला जात असताना विद्यार्थ्याच्या दुचाकीला गव्याने धडक दिली. या अपघातात विद्यार्थी व त्याचे आजोबा जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) घडली. मात्र, जखमी असूनही विद्यार्थ्याने धैर्य दाखवत परीक्षा दिल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

प्रवीण अशोक बंडीवड्डर हा दहावीचा विद्यार्थी आपल्या आजोबा शिवाजीराव बंडगर यांच्यासोबत दुचाकीवरून सरवडे येथील परीक्षा केंद्राकडे निघाला होता. शिवाजीराव खोराटे विद्यालय येथे परीक्षा देण्यासाठी जात असताना आकनूर जवळील दुधगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याजवळ अचानक गवा रस्त्यावर आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

या अपघातात प्रवीण व त्याचे आजोबा दोघेही जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने सरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. उपचारानंतर वेळ न दवडता प्रवीणला परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यात आले. जखमी अवस्थेतही त्याने परीक्षा दिली, तर शिवाजीराव बंडगर यांना पुढील उपचारासाठी घरी पाठवण्यात आले.

दरम्यान, या मार्गावर वारंवार वन्य प्राणी व जनावरे रस्त्यावर येत असल्याने अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT