कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेससाठी चेअर कारकरिता 1160 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2005 रुपये तिकीट दर आहे. मात्र प्रवासात तुम्हाला जेवण नको असेल तर मात्र याच प्रवासासाठी 796 रुपये आणि 1605 रुपये इतके तिकीट आकारले जाणार आहे. यामुळे जेवण नको असलेल्या प्रवाशांना 364 रुपयांची सवलत तिकिटात मिळणार आहे.
कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत सुरू झाली आहे. या गाडीला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. शुक्रवारी पुणे-कोल्हापूर या मार्गावर या गाडीची दुसरी तर आतापर्यंत एकूण तीन फेर्या झाल्या. प्रत्येक फेरीला प्रतिसाद वाढत असून शनिवारी पुण्याला जाणार्या गाडीसाठी शुक्रवारी रात्रीपर्यंत 410 प्रवाशांचे बुकिंग झाले होते तर रविवारी पुण्याहून कोल्हापूरपर्यंत येणार्या या गाडीत 340 हून अधिक प्रवाशांचे बुकिंग झाले आहे.
या गाडीला दोन श्रेणी आहेत. त्यापैकी एसी चेअर कारसाठी 1160 रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2005 रुपये हा तिकीट दर आहे. मात्र, हे दर प्रवासादरम्यान मिळणार्या जेवणासह आहेत. प्रवासात प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार व्हेज किंवा नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. मात्र तिकीट बुकिंग करतानाच व्हेज की नॉनव्हेज हे नमूद करावे लागणार आहे. हे जेवण नको असेल आणि जेवणाशिवाय तिकीट हवे असेल तर एसी चेअर कारसाठी 796 रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 1605 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे.