कासारवाडी : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगरायाचीवाडी फाट्याजवळ एसटी बसचा अपघात झाला. कोल्हापूरहून वाठारच्या दिशेने जाणारी बस बुधवारी (दि. २) दुपारी मंगरायाचीवाडी येथील जेपी पार्कसमोर रस्त्यालगतच्या दुभाजकावर आदळली. बसमध्ये सुमारे २५ प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोल्हापूरहून येताना या मार्गावर तीन लेन आहेत. मात्र, मंगरायाचीवाडी येथे छोटा उड्डाणपूल असल्याने रस्ता दोन लेनचा होतो. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक अरुंद होते. त्यातच समोरून येणाऱ्या तसेच भरधाव वाहनांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. बुधवारी बस या ठिकाणी आली असता चालकाने वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक ब्रेक न लागल्याने बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्यालगतच्या दुभाजकावर जाऊन आदळली.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विजय अपरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. उड्डाणपुलामुळे अरुंद होणाऱ्या या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
महामार्गाचे अर्धवट काम ठरतेय धोकादायक
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अंबप फाटा ते मंगरायाचीवाडी फाटा परिसरात महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट असल्याने वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात होऊन दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे महामार्गाच्या कामाला गती देऊन धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.