कोल्हापूर ः रखरखते ऊन अन् अंगामधून वाहणाऱ्या घामाच्या धारा अशा स्थितीत रेशन बचाव समितीने ज्वारी, हरभरा डाळ, तूर डाळ, साखर, गोडेतेल या पाच जीवनावश्यक वस्तू रेशनवर द्या, गॅस संपल्यानंतर त्वरित 500 रुपयांत घरपोच द्या, रेशन कार्डवर 5 लिटर रॉकेल द्या, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी (दि. 27) मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले.
मोर्चामध्ये जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘हम सब एक है’, ‘आमच्या मागण्या मान्य करा; अन्यथा खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत मोर्चा दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर, बसंत-बहारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चात महिला रिकामे गॅस सिलिंडर, चूल घेऊन सहभागी झाल्या होत्या. तसेच, ‘चळवळ एक मूठभर धान्या’साठी या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले.
रेशन बचाव समितीचे अध्यक्ष विजय देवणे म्हणाले, केंद्र, राज्य सरकार श्रीमंतांचे खिसे भरत आहे. सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ बेपत्ता झाली आहे. लाडक्या बहिणांचा बोजा सरकारवर वाढला आहे. निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. सचिव डॉ. रवींद्र मोरे यांनी शासनाने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा, असे सांगितले. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राठोड यांना निवेदन दिली. यावेळी राजेश मंडलिक कोल्हापूर शहर, श्रीपती पाटील हातकणंगले, आनंदा लादे पन्हाळा, संदीप काटकर कागल, संदीप पाटील करवीर, पांडुरंग सुभेदार इचलकरंजी, संघटना उपाध्यक्ष आबू बारगीर, महादेव बोडके, नाना उलपे, राजेंद्र कारंडे शिरोळ, साताप्पा शेणवी कागल उपस्थित होते.