कोल्हापूर : जिल्हा अहले सुन्नत जमाततर्फे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त (ईद ए मिलादुन्नबी) शोभायात्रा (जुलूस) आणि रक्तदान शिबिर बुधवारी घेण्यात आले. तिरंगा ध्वजासह मक्का-मदिना, ख्वाजा गरीब नवाज यांच्या प्रतिमा घेऊन अबालवृद्धांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शोभायात्रेची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी चौक घुडणपीर दर्गा येथून झाली. पापाची तिकटी, गंगावेस, हाजी सय्यद उस्मान काझी दर्गाह मार्गे हजरत सय्यद शाहजमला कलंदर दरगाह, बाबूजमाल दर्गा असा शोभा यात्रेचा मार्ग होता. यानंतर जागतिक शांततेची प्रार्थना झाली. बाबूजमाल दर्गा येथे झालेल्या शिबिरात ५० हून अधिक लोकांनी रक्तदान केले. शोभायात्रेच्या महामार्गावर ठिकठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आला. तर महाप्रसाद बाबूजमाल येथे झाला. यावेळी ईद-ए-मिलादून नबी कमिटी, हजरत पीर बाबू जमाल दर्गा, खादीम हजरत पीर घोडं पीर शहा दर्गा, खादिम हाजी काझी उस्मान मज्जिद खादिम आणि हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
हिंदू-मुस्लिम सामाजिक एकोप्याचा संदेश
मिरवणुकीतून धार्मिक उत्साहासोबतच हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि विश्वशांतीचा संदेश देण्यात आला. समाजात शांतता, बंधुभाव आणि एकोपा कायम राहावा. तसेच, विश्वशांती नांदावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.