Kolhapur municipal corporation Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur News : दीड हजार कोटींचा भूखंड अन्‌‍ प्रशासनाचे दुर्लक्ष

अमेरिकन बंगल्याचा वाद, नेत्यांचा वरदहस्त; मोक्याची शासकीय जागा होणार का फस्त?

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या अमेरिकन बंगला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारती सभोवतालचा 57 एकर 17 गुंठे क्षेत्राचा भूखंड सध्या अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. या भूखंडाच्या शासकीय मालकीविषयी दोन निकाल प्रशासनाच्या बाजूने लागलेले आहेत. महसूल मंत्र्यांसमोर झालेली अपिलीय सुनावणी पूर्ण होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. जर कोल्हापूरच्या जागरूक नागरिकांनी याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असणाऱ्या सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या या मोक्याच्या भूखंडावर पाणी सोडावे लागणार आहे.

खरे तर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्ह्यातील जबाबदार नेत्यांनी वेळीच सतर्क राहून हा भूखंड अतिक्रमणापासून मुक्त ठेवणे आवश्यक होते. मात्र, सोयीस्कर अतिक्रमणे झाल्यानंतरही प्रशासनाला त्याचे सोयरसुतक राहिले नाही. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक सामाजिक संघटना या जागेच्या शासकीय मालकीसाठी तीव्र संघर्ष करत होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 8 जानेवारी 2024 रोजी या जागेच्या शासकीय मालकीवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर पुणे विभागीय महसूल आयुक्तांनी 29 मे 2025 रोजी या निर्णयावर शिक्कामोर्तब करत दाखल झालेल्या पाच याचिका फेटाळून लावल्या. या निर्णयाविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अपील करण्यात आले होते, ज्याची सुनावणी 15 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्ण झाली आहे. मात्र, सहा महिने उलटूनही अद्याप निकाल दिला गेलेला नाही. सुनावणीनंतरच्या इतर प्रकरणांचे निकाल जाहीर झाले; पण शासकीय मालकीच्या या जमिनीचा निर्णय प्रलंबित राहिल्याने संवेदनशील कोल्हापूरकरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

अतिक्रमण करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळाले की, प्रशासकीय यंत्रणा कशी हतबल होते, याचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. एवढ्या विस्तीर्ण भूखंडावर सरकारला विकासाचे अनेक मोठे प्रकल्प राबविता आले असते. सामाजिक संघटनेने लढून जागेची मालकी सिद्ध केली असली, तरी आजही प्रशासकीय अधिकाऱ्यांना या जमिनीवर पाऊल ठेवता येत नाही. विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर रातोरात या भूखंडावर धनदांडग्यांनी संरक्षक भिंती उभारून अतिक्रमणे केली. महापालिकेची परवानगी नसतानाही हे अतिक्रमण हटविले गेले नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अशी प्रशासनाची अवस्था झाली असून, त्यांचे हातपाय बांधले गेले आहेत. ते सोडविण्याची जबाबदारी आता कोल्हापूरकरांवर आहे.

(क्रमशः)

...अन्यथा सुंदर कोल्हापूरची कल्पना स्वप्नच राहील

कोल्हापूर शहरातील अतिक्रमणांविषयी दैनिक ‌‘पुढारी‌’मध्ये मालिका सुरू झाल्यानंतर अनेक तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी या अतिक्रमणांच्या पुराचे दर्शन घडविले आहे. शिक्षण क्षेत्रातील एका ज्येष्ठ व्यक्तीने शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या संरक्षक भिंतीला लागून सुरू असलेल्या खाऊ गल्लीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेने या रस्त्याचे नामकरण अतिक्रमित खाऊ गल्ली करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. महापालिकेच्या पांजरपोळ औद्योगिक वसाहतीत आणि शाहूपुरीतील गवत मंडईतही टपऱ्यांचे साम्राज्य वाढत आहे. राजकीय आशीर्वादाशिवाय ही अतिक्रमणे उभी राहू शकत नाहीत. कोल्हापूर शहरातील शासकीय जागांचा बाजार मांडणाऱ्यांना ओळखून त्यांना सार्वजनिक जीवनातून खड्यासारखे बाहेर काढले पाहिजे, अन्यथा स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूरची कल्पना केवळ स्वप्नच राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT