कोल्हापूर : उन्हाच्या तीव—तेसोबतच विजेच्या मागणीतही सातत्याने वाढ होत आहे. 24 तास गरगरणारे पंखे, सतत सुरू असलेली वातानुकूलित यंत्रणा, यामुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांच्या वीज वापरात सुमारे 150 मेगावॅटने वाढ झाली. त्याचबरोबर शिवारातील पिके जगविण्यासाठी केवळ कृषिपंपांचाच आधार असल्याने कृषिपंपांद्वारेही पाण्याचा उपसा वाढला आहे. तेथेही सुमारे 150 मेगावॅटने विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे एकूण विजेच्या मागणीत सुमारे 300 मेगावॅटची वाढ झाली आहे.
ऐन जानेवारीतच थंडीऐवजी उकाडा होता. फेब—ुवारीमध्ये एखादा आठवडा वगळता थंडीची तीव—ता जाणवली नाही. मार्चपासूनच सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पारा 37 पार गेला. एप्रिलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा 40 अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे जानेवारीपासूनच वीज वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. उकाडा वाढल्याने पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रे यांचा वापर वाढल्याने विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली.
घरगुती, व्यापारी, औद्योगिक या वर्गवारीतील ग्राहकांचा वीज वापर वाढत असतानाच, दुसरीकडे उन्हाचा फटका पिकांनाही बसू लागल्याने कृषिपंपांचाही वीज वापर वाढत गेला. जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत तब्बल 150 ते 200 मेगावॅटने विजेची मागणी वाढली आहे. जानेवारी महिन्यात 30 हजार 361 मेगवॅट असणारा वीज वापर मार्चमध्ये सुमारे 33 हजार मेगावॅटवर पोहोचला, तर एप्रिल महिन्यात अवघ्या पंधरा दिवसांत 16 हजार मेगावॅटने विजेची मागणी वाढली आहे. कृषिपंपांचा वीज वापर जानेवारीमध्ये 12 हजार 834 मेगावॅट होता, तर मार्च महिन्यात मात्र तब्बल 18 हजार 275 मेगावॅटवर पोहोचला. एप्रिलचे आणखी पंधरा दिवस आणि मे महिन्यातील उकाडा यामुळे जिल्ह्यात 500 ते 550 मेगावॅटने विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात सौरऊर्जानिर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात सौर उपकेंद्र, रूपटॉप सोलर आदीसह विविध माध्यमांतून सुमारे 125 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. असे असूनही पारंपरिक विजेचा वापरही वाढत असल्याचे चित्र आहे. सौरऊर्जानिर्मिती नसती, तर आणखी 125 मेगावॅटने वीज वापर वाढला असता.