कोल्हापूर

Kolhapur Politics : "लय झालंय, दम असेल तर चल चौकात!', शारंगधर देशमुख-आदिल फरास यांच्या एकमेकांना आयुक्तांसमोरच धमक्या

महापालिकेच्‍या वृक्ष प्राधिकरण समिती बैठकीत तुफान राडा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सत्ताधारी महायुतीतील शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी गटनेता आदिल फरास यांच्यात मंगळवारी (दि. १) तुफान राडा झाला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासमोरच दोघेही एकमेकांना अश्लील शिवीगाळ करत अंगावर धाऊन गेले. शड्डू ठोकत चौकात ‘तुझं लय झालंय, तुला आता बघतोच... दम असेल तर चल चौकात...’ अशी धमकी देत आ‍व्हान-प्रतिआव्हान देण्यात आले.

हमरी-तुमरीपर्यंत गेल्याने अखेर पदाधिकार्‍यांनी हस्तक्षेप करत दोघांना बाजूला केले. मात्र दोघांनीही फोनाफोनी केल्याने दोघांचेही तब्बल पाचशेच्यावर समर्थक महापालिकेत आले. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

डॉ. भारूड यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील धोकादायक वृक्ष व फांद्या तोडण्यास परवानगी देण्यासाठी बैठक होती. त्यात देशमुख यांच्याशी संबंधित रंकाळा टॉवर व टिंबर मार्केट येथील वृक्षतोडीवर फरास यांनी उलटसुलट प्रश्न विचारले. अधिकार्‍यांनी उत्तरे दिल्यानंतर ते विषय मंजूर झाले. नगरसेविका मानसी लोळगे यांच्या भागातील वृक्षतोडीचा विषय आल्यानंतर देशमुख यांनी उलटसुलट प्रश्न विचारताच फरास यांना राग आला. त्‍यांनी हा विषय मंजूर झालाच पाहिजे, असा आग्रह धरला.

देशमुख यांनी ‘आमच्या विषयात तू उलट प्रश्न विचारताना चालतंय आणि आम्ही विचारलं तर चालत नाही काय?’ असे म्हणत अधिकारी उत्तरे देऊ देत, असे सुनावले. त्यावर फरास यांनी ‘तुझे सर्व विषय मंजूर होणार आणि आमचे नाहीत... असे चालणार नाही, हे खपवून घेणार नाही’ असे म्हटले. त्यावरून वादाची ठिणगी पडली.

अन् आयुक्त उठून गेले...

सभागृहात देशमुख व फरास हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसले होते. जागेवर उभे राहून दोघेही एकमेकांना आ‍व्हान व धमक्या देत होते. दुपारी २.२० ते २.३० असे दहा मिनिटे दोघेही त्‍यांच्‍यात अर्वाच्य शिवीगाळीची देवाणघेवाण सुरू होती. दोघांनाही आयुक्त डॉ. भारूड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, काँग्रेस गटनेता इंद्रजित बोंद्रे आदींसह इतर शांत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ते ऐकत नव्हते. अखेर डॉ. भारूड वैतागून बैठकीतून उठून गेले. त्यानंतर पदाधिकारी व अधिकार्‍यांनी फरास यांना आयुक्तांच्या तर देशमुख यांना त्यांच्या केबिनमध्ये नेले. मग समितीची बैठक गुंडाळण्यात आली.

एकमेकांना आव्हान...

देशमुख व फरास यांनी एकमेकांना ‘तू काय महापालिकेचा मालक लागून गेलास काय? तुझं लय झालंय, तुला आता बघतोच... दम असेल तर चल चौकात... तुला माझा हिसका दाखवतो’ अशा भाषेत आ‍व्हान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT