कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात असून, कोल्हापूरच्या राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रविकिरण इंगवले यांनी आपला राजीनामा थेट प्रसिद्धी माध्यमांना जारी केला आहे. विशेष म्हणजे, या राजीनामा पत्रात त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यामागचे कोणतेही ठोस कारण किंवा विश्लेषण दिलेले नाही. अत्यंत गुप्तता पाळत त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इंगवले यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ठाकरे गटातील अंतर्गत वादाला वाचा फुटल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी असलेले मतभेद आणि जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीला कंटाळूनच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.