कोल्हापूर : जिल्ह्यात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुकीसाठी नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीतील दोन नेते जिल्ह्यातील राजकारण करायला सरसावले आहेत. येत्या निवडणुकीत स्ट्रायकर कोणाच्या हातात, असा प्रश्न राजकीय कॅरमच्या निमित्ताने विचारला जात आहे. खेळाच्या स्पर्धांपासून ते वारकर्यांच्या दिंड्यांपर्यंत एकही संधी राजकारणी सोडत नाहीत. या माध्यमातून त्यांची संपर्क मोहीम सुरू असते. शारंगधर देशमुख यांनी आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेच्या माध्यमातून पूर्वापार विरोधक एकत्र आले आणि गेम कुणाचा होणार, याची चर्चा रंगली.
धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून थेट राष्ट्रवादीविरुद्ध दोन हात केले. लोकसभेच्या या आखाड्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर बदलत्या परिस्थितीत तेच राष्ट्रवादीकडून उभारले आणि विजयी झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी रिबाऊंड शॉट मारला की ते भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर निवडून आले. मध्यंतरी राजकारणाच्या पटावर काहीसे एकाकी पडल्यानंतर पुन्हा सारा खेळच आपल्या हाती घेण्याची तयारी त्यांनी ‘गोकुळ’च्या माध्यमातून सुरू केली आहे. जोडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेतच.
जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले प्रकाश आबिटकर पक्षाचा तरुण चेहरा. शिवसेनेतून ते शिंदे शिवसेनेत गेले. कुठलाही वरदहस्त पाठीशी नसताना त्यांनी असा अचूक स्ट्रायकर मारला की सर्वजण बघतच राहिले. एकदा ब्रेक दिला की ओपन टू फिनिश मारण्यात ते माहीर आहेत. याचा अनुभव जिल्ह्यातील राजकारण्यांनी यापूर्वीही घेतला आहे.
शारगंधर देशमुख आणि धनंजय महाडिक यांच्यातील वाद हा गटाचा. सतेज पाटील गटाचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेले शारंगधर देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी डावलल्याची भूमिका मनात धरून सवतासुभा उभारला. आता ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्या माध्यमातून आता महायुती म्हणून ते आणि महाडिक एकत्र असतील. या कॅरमच्या पटावर महाडिक यांच्या बरोबर देशमुख यांनी रिबाऊंड शॉट मारला आहे.
प्रा. जयंत पाटील राजकारणातील गट आणि पक्ष फिरून आले. कधी मंडलिक, कधी महाडिक, कधी मुश्रीफ, कधी कोरे, मधल्या काळात सतेज पाटील असे कॅरमचे चारही कोन फिरून आलेले पाटील यांचा कॅरमच्या बोर्डावर कटशॉट मारण्यात हातखंडा मानला जातो. कटशॉटच्या माध्यमातून अचूकपणे टिपणे यात ते वाकबगार मानले जातात.