धीरज बरगे
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना गोकुळ निवडणुकीत सोबत घेण्यास नकार दिला आहे. त्यांना महायुतीमधून उमेदवारी देता येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. रविवारी (दि. २१) सकाळी मंत्री मुश्रीफ, ए. वाय. पाटील यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील सध्या काँग्रेससोबत आहेत; मात्र सध्या त्यांनी गोकुळ निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहणार असल्याची भूमिका घेतली होती. राधानगरी तालुक्यात महायुतीमधून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगत दूध संस्थांचे ठरावही गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची ही भूमिका तालुक्यात चर्चेत आली होती. हा प्रकार समजताच मंत्री मुश्रीफ यांनी रविवारी सकाळी एकेठिकाणी ए. वाय. पाटील यांच्यासोबत चर्चा करत महायुतीमधून उमेदवारी देता येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले.
आ. सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय
मंत्री मुश्रीफ यांच्याकडून नकार मिळाल्यानंतर पाटील यांनी राशिवडे येथे एका काँग्रेस नेत्याच्या घरात राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक घेतल्याचे समजते. त्यांनी गोकुळ निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही समजते.