कोल्हापूर: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक अत्यंत मोठा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणत्याही विद्यमान आमदार किंवा खासदाराच्या पुत्राला महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. या निर्णयाचा आदर राखत कोल्हापूरचे युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी आज (दि.२८ डिसेंबर) आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात एका गुप्त ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, महापालिका निवडणुकीत आमदार किंवा खासदारांच्या घरात उमेदवारी दिली जाणार नाही. घराणेशाहीला फाटा देऊन सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीतून माघार घेताना कृष्णराज महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष ही शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा मी आदर करतो. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून, पक्षहितासाठी मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही."
महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी हा यामागचा उद्देश आहे. वरिष्ठांच्या सांगण्यावरूनच आधी उमेदवारी जाहीर केली होती, आता बदललेल्या धोरणानुसार माघार घेत आहे. पक्षाने उमेदवारीसाठी माझ्या नावाचा विचार केला, हेच माझ्यासाठी समाधानाचे आहे. निवडणूक लढवणार नसलो तरी, जनतेची सेवा आणि समाजकारण यापुढेही सक्रियपणे सुरू राहील. भाजपच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.