कोल्हापूर : जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारावरून वैयक्तिक आरोप करणाऱ्या आमदार शिवाजी पाटील यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शिवाजी पाटील यांनी केलेले आरोप अत्यंत निराधार आणि बदनामीकारक असून, त्यांच्या विरोधात न्यायालयात १०० कोटी रुपयांचा फौजदारी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा कडक इशारा मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
"हसन मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळात स्वतःकडील कोट्यवधी रुपये जिल्हा बँकेत आणून बदलून घेतले आणि बँकेला अडचणीत आणले," असा गंभीर आरोप आमदार शिवाजी पाटील यांनी केला होता. या आरोपाचा समाचार घेताना मुश्रीफ म्हणाले की, हे सर्व आरोप केवळ राजकीय आकसापोटी केले जात आहेत. बँकेची प्रतिमा मलीन करण्याचा आणि वैयक्तिक चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे आता या वादाचे पडसाद न्यायालयात उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुश्रीफ यांनी आपल्या पत्रात शिवाजी पाटील यांच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "गेल्या पाच वर्षांच्या काळात आमदार पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या कारभाराविषयी साधा 'ग' सुद्धा कधी उच्चारलेला नाही. आज अचानक त्यांना गोकुळ आणि जिल्हा बँकेचा पुळका कसा आला?" असा खोचक सवाल त्यांनी केला.
जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमधील हा वाद आता विकोपाला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शंभर कोटींच्या फौजदारी दाव्याच्या इशाऱ्यामुळे आमदार शिवाजी पाटील यांची पुढची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.