कोल्हापूर : ‘गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता आहे आणि गोकुळचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत, ही आम्ही मांडलेली भूमिका दूध उत्पादकांना पटली. त्यामुळे त्यांनी शाहू समविचारी आघाडीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला,’ असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. गोकुळच्या कारभाराचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत, ही भूमिका आम्ही सातत्याने मांडली आणि दूध उत्पादकांनी या भूमिकेला पाठिंबा दिल्यानेच शाहू समविचारी आघाडीला विजय मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळच्या निवडणुकीत आमच्या आणखी सहा ते सात जागा निवडून आल्या असत्या, किमान २० जागा जिंकण्याचा विश्वास होता; मात्र काही मते बाद झाल्याने अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीतील विजयानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांच्या भूमिकेवर टीका केली. "मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारायला हवा होता," असे ते म्हणाले.
निवडणुकीत पराभूत झालेल्या महायुतीच्या दोन उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दिल्यामुळे निकालाची प्रक्रिया तीन तास लांबली, असा दावा पाटील यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम केले, त्यामुळे या दोन्ही उमेदवारांची फेरमतमोजणी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.