कोल्हापूर : महादेवराव महाडिक आणि दिवंगत पी. एन. पाटील यांच्या काळात गोकुळचा कारभार चोख होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत खूप काही झाले, असा आरोप करत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच डाव्या, उजव्या हातांनी तक्रारी केल्या, त्यातून विनाकारण वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, असे खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गोकुळमध्ये सत्तांतर झाले. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघाच्या राजकारणात हस्तक्षेप केला. सर्वांना एकत्र करण्याची खेळी यांच्या पुढाकारानेच झाली, अशी टीका माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता खा. महाडिक यांनी केली.
शेवटचे अध्यक्ष पद हे महायुतीच्या अध्यक्षांकडे होते. मात्र, त्यापूर्वी चार वर्षांचा कारभार माजी पालकमंत्री यांच्याकडेच होता. जो भष्टाचार झाला, घोटाळा झाला हा जग जाहीर आहे. काल त्यांनी जे व्यक्तव्य केले ते खरे आहे. पंचवीस वर्षे गोकुळ महाडिक यांच्या हातात होता. त्यावेळी कोणालाही हस्तक्षेप करता येत नव्हता, असेही खा. महाडिक म्हणाले.
...म्हणूनच महापालिकेत सत्तांतर झाले!
गोकुळमधील त्यांचा चार वर्षांचा कारभार सर्व दूध संस्थांनी पाहिलेला आहे. तसेच त्यांचा पंधरा वर्षांतील महापालिकेचा कारभार नागरिकांनी पाहिला म्हणूनच सत्तांतर झाले, असे सांगत यावेळी त्यांनी कितीही प्रयत्न केला, तर गोकुळचा निकाल हा महायुतीच्या बाजूने राहणार असेही खा. महाडिक म्हणाले.