कोल्हापूर : गोकुळवरून गेल्या दहा दिवसांपासून शांत असलेला मंत्री हसन मुश्रीफ आणि आ. शिवाजी पाटील यांचा संघर्ष पुन्हा उफाळला आहे. आपल्यावर आरोप करणारे आ. पाटील सध्या शांत आहेत, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, असे वक्तव्य मुश्रीफ यांनी करून दोनच दिवस उलटले नाही तोपर्यंत भाजप समर्थक आ. शिवाजी पाटील यांनी पुन्हा मुश्रीफांवर हल्लाबोल केला. यामुळे गोकुळमधील महायुतीमधीलच संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
मुश्रीफमुक्त गोकुळसाठीच प्रयत्नशील : आ. पाटील
जिल्ह्यात भाजप संपवण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात मुश्रीफमुक्त गोकुळ करणारच, असा पुन्हा एकदा थेट इशारा आ. शिवाजी पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. गोकुळ शिरगावातील प्रकल्पस्थळी प्रशासक मंडळ अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांच्याशी संघाच्या प्रशासकीय, दूध उत्पादकांच्या हिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यानंतर पाटील यांनी मुश्रीफांवर तोफ डागली.
मुश्रीफांच्या सत्ताकाळात प्रशासक नामुष्कीजनक
ते म्हणाले, चाळीस वर्षांहून अधिक काळ मंत्री असलेले आणि जिल्ह्यात गोकुळ, जिल्हा बँकेसह अनेक सहकारी संस्थांवर नेतृत्व करणारे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सत्ताकाळातच गोकुळवर प्रशासक येणे नामुष्कीजनक आहे. गोकुळवर सत्ता महायुतीची म्हणतात. पण महायुतीच्या नियमांचे अजिबात पालन होत नाही. यावेळी प्रशासकांशी झालेल्या चर्चेत पाटील यांनी, गोकुळ दूध विक्रीत वाढ होण्यासाठी वितरकांची संख्या वाढवण्यासह प्रामुख्याने स्थानिक वितरकांची नियुक्ती करून त्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश बेलवाडेही उपस्थित होते.
मुश्रीफमुक्त गोकुळ करायचे की नाही हे सभासद ठरवतील : मंत्री मुश्रीफ
मुश्रीफमुक्त गोकुळ करायचे की नाही हे सभासद ठरवतील, आमदार शिवाजी पाटील नाही, असा पलटवार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांच्या कारभारात गोकुळमध्ये एकही भष्टाचाराचे प्रकरण सापडणार नाही, असेही मंत्री मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळ निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. संघाचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल. साखर कारखान्यांना जिल्हा बँकेने चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केल्याचा आरोप ते सातत्याने करत आहेत. त्यांनी खुशाल बँकेच्या कारभाराची चौकशी करावी, साखर कारखानदारांनी हे सगळे बघून घ्यावे. आमदार शिवाजी पाटील यांनी वैयक्तिक टिप्पणी करण्याचे बंद केल्याने त्यांचे आभार मानले होते. पण आता ते मुश्रीफमुक्त गोकुळ करण्याची भाषा करत आहेत. पण हे ठरविण्याचा अधिकार त्यांना नसून याबाबत गोकुळचे सभासद निवडणुकीवेळी योग्य निर्णय घेतील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मला जिल्हा बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल
मंत्री मुश्रीफ यांनी शंभर कोटींचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी शंभर कोटींच्या दाव्याला मी घाबरत नाही. पण हे शंभर कोटी आणायचे कुठून हा प्रश्न आहे. यासाठी मला आता जिल्हा बँकेतून कर्ज घ्यावे लागेल. जसे त्यांनी यापूर्वी साखर कारखान्यांना दिले आहे.