कोल्हापूर

कोल्हापूर : स्थानिक आघाड्यांमध्येच चुरस

Arun Patil

कोल्हापूर : गावचे कारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत बहुतांशी ठिकाणी नेत्यांकडे कानाडोळा करत कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सोयीच्या आघाड्या केल्या आहेत. त्यामुळे या आघाड्यांमध्ये गावांत सामना रंगणार आहे. गारगोटीसारख्या काही मोजक्या गावांत नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. माघारीची मुदत संपल्यामुळे आता वातावरण तापू लागले आहे.

जिल्ह्यातील 89 ग्र्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर 44 ग्र्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर 16 ग्रामपंचायतींच्या, तर 15 गावांतील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. गावागावांतील लढती स्पष्ट झाल्यामुळे आता बैठकांना जोर आला आहे.

ग्रामीण भागातून कार्यकर्ते तयार करणार्‍या ग्रामपंचायतींकडे राजकारणाची पहिली पायरी म्हणून पाहिले जाते. यातूनच तालुका आणि जिल्हा पातळीवरील नेतृत्व उदयास येत असते. पूर्वी ग्रामपंचायतींना अधिकार मर्यादित होते. परंतु, ग्रामीण भागात विकासाची महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या आणि शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार्‍या ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी शासनाने त्यांना जादा अधिकार देण्यास सुरुवात केली. आता तर वित्त आयोगातून मिळणारा निधी थेट ग्रामपंचायतींकडे जमा होऊ लागल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतील चुरस चांगलीच वाढली आहे. सरपंचांना जादा अधिकार दिल्यामुळे आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून होत असल्याने सरपंचपदाच्या निवडी राजकीयद़ृष्ट्या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

करवीरमध्ये 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यातील 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील 2 गावे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात, तर राहिलेली करवीर विधानसभा मतदारसंघात येतात. आजरा तालुक्यातील 8 पैकी 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाला आहेत. या तालुक्यातील काही गावे भुदरगड, राधानगरी, काही गावे चंदगड, तर काही गावे कागल विधानसभा मतदारसंघात येतात.
चंदगड तालुक्यातील 22 पैकी 3 गावांची निवणूक बिनविरोध झाली आहे. या तालुक्यात पक्षापेक्षा गटा-तटाचे राजकारण जोरात चालत असले, तरी कार्यकर्त्यांनी सोयीप्रमाणे आघाड्या केल्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील 14 पैकी 1 गावाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शाहूवाडीतील 12 पैकी 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

गावपातळीवरील राजकारणामध्ये नेतेदेखील फारसे लक्ष देत नाहीत. शिवाय, ग्रामपंचायतींच्या निवडणुका या वैयक्तिक संबंधांवरदेखील बर्‍याच अवलंबून असतात. माघार झाल्यामुळे आता प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. गावकर्‍यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. मंडळे नाराज होणार नाहीत, याचीही काळजी उमेदवार व त्यांचे समर्थक घेत आहेत. त्यामुळे बैठकांना जोर येऊ लागला आहे.

गारगोटीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

भुदरगडमध्ये 7 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या तालुक्याचे आ. प्रकाश आबिटकर यांचे गारगोटी गाव असल्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राधानगरीतील 12 पैकी 3 गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT