कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचे पालकमंत्री, शिंदे गटाचे खासदार आणि शेतकरी सहकारी संघाचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष शिंदे गटाचे असताना शेतकरी संघाचे कुलूप तोडण्याचे धाडस जिल्हाधिकार्यांचे झालेच कसे? असा सवाल करत वास्तविक त्यांनी हा प्रश्न हाताळला पाहिजे म्हणून मी यात भाग घेतला नाही, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव शंकरराव शिंदे तथा बाबा नेसरीकर यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. संजय मंडलिक होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेतकरी संघाची प्रतिमा उंचावण्याचे काम बाबा नेसरीकर यांनी आपल्या कर्तृत्वातून केले. संघ केवळ खतापुरता मर्यादित न ठेवता नेसरीकर यांनी विविध उद्योग निर्माण केले. संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, पण पेट्रोल पंप प्रश्नी खा. मंडलिक यांनी लक्ष द्यावे. संघ अडचणीत असून पूर्वपदावर आणण्यासाठी, संघाची निवडणूक बिनविरोध करून चांगले संचालक पाठवूया, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.
खा. मंडलिक म्हणाले, शेतकरी संघ सहकारचे मंदिर असून संघाची जागा ताब्यात घेऊया. नव्या ताकदीने संघाला बळ देऊया. आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, सहकाला घरघर लागली आहे. अशा परिस्थितीत सहकाराला उभारी देण्यासाठी बाबा नेसरीकर यांच्यासारख्या नि:स्वार्थी व्यक्तींची गरज आहे.
प्रास्ताविक अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी संघाची निवडणूक बिनविरोध करा, संचालक म्हणून चांगल्या व्यक्तींना संधी द्यावी. निवडणुकीचा खर्च संघाला परवडणार नसल्याने संघाला खत परवाना, एमआयडीसीतील मिरची पूड कारखान्याला नाहरकत प्रमाणपत्रसह पेट्रोल पंप जागेचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
अशासकीय प्राधिकृत अधिकारी, मंडळाचे सदस्य अजित मोहिते, जयवंत पाटील, माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते, सरपंच गिरिजा शिंदे, यशोधन शिंदे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री, जिल्हाधिकार्यांचा हट्ट कशासाठी ?
संघाला कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कुलूप तोडून ताबा घेतला. जागेचा उपयोग कसा होणार ते आम्हाला पटवून द्यावे. या जागेप्रश्नी मॅग्नेट कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. तोपर्यंत जिल्हाधिकारी यांनी कुलूप तोडलेच कसे? पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचा हट्ट कशासाठी, असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला. येथून मॅग्नेट कंपनीला बाहेर काढले जाणार असेल तर जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.