गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : गेले दोन दिवस लोकसभा उमेदवारी संजय मंडलिकांना देऊ नका, अशी भूमिका भाजपाचे विशेष निमंत्रित सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी घेतली होती. यावरून बरेच घमासान झाल्यानंतर तसेच पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून याची दखल घेतली गेल्याने वरिष्ठ नेत्यांकडून कुपेकर यांना हे वक्तव्य मागे घेण्यास सांगण्यात आले असून, पक्ष आदेश अंतिम असल्याचे सांगितल्यानंतर कुपेकर यांनी प्रसिद्धीपत्रक देत पक्षाने मंडलिकांना उमेदवारी दिल्यास प्रामाणिकपणे प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले.
कुपेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात खासदार संजय मंडलिक यांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध असल्याची भूमिका मी अनवधानाने व्यक्त केली होती. मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता असून, पक्षाचे आणि महायुतीमधील वरिष्ठ नेते उमेदवारीचा जो अंतिम निर्णय घेतील आणि त्याचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. खासदार संजय मंडलिक यांच्याशी वैयक्तिक स्तरावर कोणतेही मतभेद अथवा राजकीय स्पर्धा नाही. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केल्यास भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व त्यांच्या प्रचारात हिरिरीने उतरू. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास अथवा चुकीचा अर्थ निघत असल्यास मी दिलगिरी व्यक्त करत आहे. महायुतीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार असतील त्यांचा प्रामाणिक प्रचार करून त्यांना विजयी करण्यास माझे सर्वतोपरी प्रयत्न असतील, असे स्पष्ट केले आहे.