कोल्हापूर

कोल्हापूर : नेत्यांच्या हाती कासरा, तरी शेतकरी संघ तोट्यात कसा?

दिनेश चोरगे

कोल्हापुर :  आशिया खंडातील सहकारी चळवळीचा मापदंड असलेला शेतकरी सहकारी संघ आज तोट्यात आहे. संघाच्या 35 शाखा बंद आहेत. संघाचा तोटा दिवसेंदिवस वाढतच आहे. कामगारांची अवस्था केविलवाणी आहे. बड्या बड्या नेत्यांच्या हाती संघाच्या कारभाराची सूत्रे असूनही व या नेत्यांच्या संस्था फायद्यात असूनही त्यांंचेच नियंत्रण असलेला शेतकरी संघ तोट्यात का, हे अनाकलनीय आहे. संघात नेते पक्ष व झेंडे तसेच संघर्ष विसरून एकत्र आले. मग आता ही सगळी मंडळी शेतकरी संघाला गतवैभव देणार का… त्याची जबाबदारी घेणार का… असा प्रश्न विचारला जात आहे.

शेतकरी सहकारी संघ हा सहकारात अभ्यासाचा विषय होता. परदेशातून सहकाराचा अभ्यास करण्यासाठी आलेली मंडळी संघाला आवर्जून भेट देत असत. मात्र सहकारात राजकारण शिरल्यानंतर जे काही होते, तेच शेतकरी संघाचे झाले. मोक्याच्या जागा कर्जापोटी विकल्या. भाड्याच्या जागा सोडल्या, मध्यवर्ती ठिकाण असूनही शेतकरी बझार चालविता आला नाही. हे कारभाराचे अपयश आहे. ज्यांच्या ज्यांच्या हाती कारभाराची सूत्रे होती, ते सगळे आणि त्यांच्यावर ज्यांचे नियंत्रण होते ते सगळे नेते याला जबाबदार आहेत. ही जबाबदारी ते कसे टाळणार?

हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, धनंजय महाडिक एकत्र

ज्यांच्या हाती सत्तेचा कासरा, त्या नेत्यांच्या संस्था फायद्यात असताना शेतकरी संघ तोट्यात कसा, याचे उत्तर कोणाला तरी द्यावे लागणार ना? राजकारणापासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्यांचा परस्परांशी संघर्ष झाला, ते सगळे नेते संघात एका व्यासपीठावर आले आहेत. त्यामध्ये हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील हे दोघे मंत्री, आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश पाटील, राजूबाबा आवळे, खासदार धनंजय महाडिक, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील हे सगळे नेते एकत्र आले आहेत.
त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. मात्र शेतकरी संघात ते एकत्र आहेत.

शेतकरी संघाचा संचित तोटा दीड कोटी रुपयांच्या घरात आहे. निवडणुकीचा 50 लाख खर्च गृहीत धरला तर तो दोन कोटी रुपयांच्या घरात जाईल. हा तोटा भरून काढण्याचे आव्हान या नेत्यांसमोर असणार आहे. विश्वास हेच संघाचे मुख्य भांडवल आहे. ही विश्वासाची शिदोरी जपली तर संघाला गतवैभव मिळू शकते. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.

मालमत्ता विक्रीचा प्रस्ताव आल्यास संचालकांनी राजीनामे द्यावेत : कोरे

शेतकरी संघाची मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी आहे. त्याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र उद्याच्या काळात जर मालमत्ता विक्रीचा निर्णय घेण्याची वेळ आली तर संचालक मंडळाने राजीनामा द्यावा, असे सांगून विनय कोरे यांनी मालमत्ता विक्रीची स्वप्ने पाहणार्‍यांना प्रचाराच्या शुभारंभातच दम भरला.

संघाची मालमत्ता 200 कोटींची

मुंबईत अंधेरी येथे 4 फ्लॅट, पेट्रोल पंप, नवी मुंबईत दोन गोदामे, मशिद बंदर मुंबईला
शाखा, मुंबई खांडबाजारात गोदाम.
कोल्हापुरात भवानी मंडपात मध्यवर्ती कार्यालय, टिंबर मार्केट व शाहू मार्केट यार्ड
येथे जागा, महापालिकेच्या मार्केटमध्ये दोन ठिकाणी गाळे, लक्ष्मीपुरीत जागा.
परिते (ता. करवीर) येथे जागा, गोदाम व पेट्रोल पंप, चंदगड, सरवडे, राधानगरी,
कार्वे, चंदगड येथे जागा.
इचलकरंजीला गोदामे, कणेरीवाडीत पेट्रोेल पंप व जागा.
वडगाव, लिंगनूर कापशी, कागल, गारगोटी, गोकुळ शिरगाव एमआयडीसीत जागा.
यासह अन्य ठिकाणी शेतकरी संघाच्या जागांचे बाजारमूल्य सुमारे 200 कोटी
रुपयांहून अधिक आहे.

165 कोटींचा व्यवहार

शेतकरी संघाचा आजचा कारभारही 165 कोटी रुपयांच्या घरात आहे. 300 कायम व 50 रोजंंदारी कर्मचारी आहेत. त्यांच्या पगारावर दरमहा 48 लाख रुपये खर्च होतात.

दि. 23 ऑक्टोबर 1939 शेतकरी संघाची स्थापना
पी. ए. राणे शेतकरी संघाचे संस्थापक
करवीर संस्थानचे संघाला सर्वतोपरी सहकार्य
तात्यासाहेब मोहिते यांनी संघाचा विस्तार वाढविला
संघाच्या प्रगतीत बाबा नेसरीकर यांचे मोलाचे योगदान
1964 ते 1984 शेतकरी संघाचा सुवर्णकाळ
बैल हा संघाचा ब—ँड लोकप्रिय
34 हजार व्यक्ती सभासद
1 हजार 800 संस्था सभासद

SCROLL FOR NEXT