कोल्हापूर

निकाल लागला, जोडण्या सुरू; लोकसभा निवडणूक ठरविणार विधानसभेची गणिते

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र निकाल आल्यानंतर राजकीय आघाडीवर तूर्त शांतता असली तरी अस्वस्थता कायम आहे. आता निवडणुका जशा जवळ येतील, तसे राजकीय वातावरण ढवळून निघेल. राजकारण्यांची अस्वस्थता वाढविणारा न्यायालयाचा निकाल आल्याने लोकसभेच्या जोडण्या सुरू होणार आहेत. या निवडणुकीतच विधानसभा निवडणुकीची गणिते दडली आहेत. आगामी काळात नेत्यांचे दौरे वाढतील. यातून निवडणुकीचे वातावरण तयार होणार आहे.

शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे व त्यांचा गट शिवसेनेतून बाजूला झाला. तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांच्या समर्थनार्थ केवळ आमदार प्रकाश आबिटकर हे ठामपणे उभे राहिले. ते निम्म्या वाटेतून परतले, अशीही चर्चा झाली. पण ते शिंदे गटाबरोबर आजही कायम आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या व्यासपीठावरून सभा गाजविणारे खासदार धैर्यशील माने अनपेक्षितरीत्या शिंदेंसोबत गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यांचे शिंदे गटाबरोबर जाणे कोणालाही अपेक्षित नव्हते. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केला. एकापाठोपाठ एक शिवसेनेचे नेते ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या मागे उभे राहात असताना ठाकरे गोटात खळबळ उडणे स्वाभाविकच होते. अपक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मूळ शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळविले. त्यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकला.

या सर्व पार्श्वभूमीवर खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरून बोलताना 'गेले ते बेन्टेक्स व राहिले ते खरे सोने' अशी टिपणी केली होती. त्यामुळे ठाकरे गटात उत्साह संचारला. मात्र मंडलिक यांच्या या वक्तव्याच्या बातमीच्या छपाईची शाई वाळण्यापूर्वीच त्यांनीही उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आणि ठाकरे गटाला आणखी एक जोराचा झटका बसला. प्रकाश आबिटकर हे राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार निवडून आले. ते शिंदे गटात गेले; तर अपक्ष निवडून येऊन शिवसेनेला पाठिंबा दिलेले शिरोळ मतदारसंघाचे आमदार यड्रावकरही शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यातील विधानसभेची शिवसेनेची पाटी कोरी राहिली. राजेश क्षीरसागर 2019 ला कोल्हापूर उत्तरमधून पराभूत झाले.

नव्या राजकारणाची फेरमांडणी होणार

शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले संजय मंडलिक व धैर्यशील माने हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्यापासून तयारी करावी लागणार आहे. संजय मंडलिक यांनी तेव्हा राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. आज महाडिक भाजपचे तर मंडलिक शिंदे गटाचे खासदार आहेत. दोघेही महायुतीमध्ये आहेत. धैर्यशील माने व संजय मंडलिक शिंदे गटातून निवडणूक लढवतील. या निवडणुकीपासून पुढच्या नव्या राजकारणाची फेरमांडणी सुरू होईल. मंडलिक व माने यांना कोण कोण समर्थन देणार यावर त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. तोवर आखाड्यात पैलवान जसे खडाखडीत एकमेकांचा अंदाज घेतात, तशी खडाखडी राजकारणात सुरू आहे.

SCROLL FOR NEXT