चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच वेगळ्या दिशेने चालते. यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेत राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत होता; मात्र आता कोल्हापूरच्या विकासावर दोन्ही शिवसेनेतच जुंपली आहे. शिंदे व ठाकरे शिवसेनेचे नेते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत.
एकत्रित शिवसेनेचे कोल्हापुरात सहा आमदार होते; मात्र वरिष्ठांनी लक्ष न दिल्याने ती संख्या एकवर आली. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे शिवसेनेचे चार आमदार व एक खासदार निवडून आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच आता शहराच्या विकासकामांवरून दोन्ही गट आमने-सामने आले आहेत.
शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी आणले. याचा शिंदे शिवसेनेने चांगलाच गाजावाजा केला; मात्र त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे सेनेने पहिल्यांदा ठेकेदारांचे पैसे भागवा, अशा शब्दांत आव्हान दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्यासाठी एका रात्रीत समारंभ स्थळापर्यंत रस्ता करण्यात आला. त्यावरून ठाकरे शिवसेनेने चांगलेच घेरले आहे. जिथे 23 वर्षे रस्त्यावर डांबर पडले नाही तो रस्ता एका रात्रीत होतो. मग, शहरातील बाकीच्या रस्त्यांचे काय, असा सवाल त्यांनी विचारला.
एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग कोल्हापुरातून फुंकले. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा. जिल्ह्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत केवळ महायुतीला सर्वच्या सर्व जागांवर विजय करून विरोधकांना चारी मुंड्या चित केले आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विरोधकांना चारी मुंड्या चित करा, असे आवाहन त्यांनी केले.
23 आणि 23...
शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी आल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी 23 कोटींचाच निधी आला. ठाकरे शिवसेनेने यावर आक्षेप घेतलाच. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी समारंभ स्थळापर्यंत 23 वर्षे ज्या रस्त्याला डांबर लागले नाही तो रस्ता एका रात्री कसा झाला, असा सवाल केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात 23 आणि 23 चीच चर्चा रंगली.