कोल्हापूर : आचारसंहिता सुरू असताना रात्री उशिरापर्यंत व्यापारी आस्थापना कशा सुरू राहतात, आपण नेमके काय करता, असे खडे बोल सुनावत जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांनी गांधीनगर पोलिसांसह सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांची खरडपट्टी काढली. बुधवारी मध्यरात्री दीड-दोन वाजता हा प्रकार झाला.
जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित तावडे हॉटेलमार्गे गांधीनगर पोलिस ठाण्यात बुधवार उजाडताच रात्री दीड-दोनच्या सुमारास आले. त्यांनी ठाणे अंमलदारांना सुनावले की, अजून पोलिस व्हॅन दारातच कशा आहेत? पेट्रोलिंगला अजून कोणी गेले का नाही? आचारसंहितेचा भंग होताना सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव गेले कुठे?
दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव पोलिस ठाण्यात आले. जाधव यांना पंडित म्हणाले की, आपण काय करता? कोणाच्या आशीर्वादामुळे व्यापारी आस्थापना इतका वेळ सुरू राहतात?आपल्याकडून जी सदोष सेवा होत आहे ती कारवाईस पात्र आहे. तशी कारवाई मला करणे भाग पडेल. त्यावर जाधव निरुत्तर झाले.