एमडी ड्रग्जसह 10 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा हस्तगत 
कोल्हापूर

Kolhapur Drug Raid : एमडी ड्रग्जसह 10 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा हस्तगत

सायबर चौकात दोन तस्करांना बेड्या; गोवा कनेक्शन उघड

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राजारामपुरी येथील मध्यवर्ती सायबर चौकात एमडी ड्रग्जसह 10 लाख रुपये किमतीच्या हायड्रोपोनिक गांजाची खुलेआम विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी (दि. 14) बेड्या ठोकल्या. अबाहिम जॉकी घोन्सालीस (वय 23, रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) व शाहिद इबाहिम मोकाशी (21, रा. ऐनापूर, गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून 12 लाख 47 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी तस्करीचे गोवा कनेक्शन चव्हाट्यावर येत आहे.

हायड्रोपोनिक गांजा हा अत्यंत तीव आणि नशेची झिंग देणारा कुत्रिम गांजा आहे. वातानुकूलीत यंत्रणेद्वारे याची निर्मिती केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या गांजाला मोठी मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किलोमागे एक कोटी रुपये असा याचा भाव आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात हायड्रोपोनिक गांजा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गांजाच्या निर्मिती आणि तस्करीमागे कुख्यात टोळीचा सहभाग असू शकतो, असे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चंदन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संशयित घोन्सालीस, मोकाशीला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीत महाराष्ट्रासह गोव्यातील धागेदोरे उघडकीला येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. एमडी ड्रग्ज आणि अतितीव असलेला गांजा विशेषत: 17 ते 25 वयोगटातील तरुण नशेसाठी वापरतात. गोव्यातील तस्करीचे कनेक्शन चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. तस्करांकडून 3 लाख 13 हजार 100 रुपये किमतीचा 31.310 ग््रॉम हायड्रोपोनिक गांजा, 3 लाख 35 हजार 400 रुपये किमतीचे 33.540 ग््रॉम एमडी ड्रग्ज, याशिवाय 2 लाख 45 हजार 200 रुपये किमतीचा अन्य मुद्देमाल, असा 12 लाख 47 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे सांगण्यात आले. संशयित अबाहिम घोन्सालीस इव्हेंटची कामे घेतो, तर मोकाशी कॉलेज विद्यार्थी आहे. तस्करीतून दोघांचा परिचय झाला आहे. संशयितांवर शहर, जिल्ह्यासह गोव्यात गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. या रॅकेटमध्ये केव्हापासून त्यांचा संपर्क आला, याचीही माहिती घेण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT