नागाव : शिरोली परिसरात गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या एका विचित्र कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. टोप येथील एका बीअर शॉपीवर कारवाईच्या उद्देशाने धाड टाकण्यात आली. मात्र, अपेक्षित कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी चक्क देशी दारूच्या बाटल्या घेऊन पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे हे खरे पोलीस होते की तोतये, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी टोप परिसरातील एका बीअर शॉपीवर अचानक धाड टाकली. शॉपीमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सुरुवातीला भासले. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला प्रकार वेगळाच होता. धाडीदरम्यान पोलिसांनी शॉपीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यास मालकास सांगितले. त्यानंतर सुमारे चार ते पाच हजार रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या ताब्यात घेऊन मालकासही सोबत नेण्यात आले. मात्र, पोलिस ठाण्यात नेण्याऐवजी त्या सर्वांना टोप येथील एका माळावर नेण्यात आले, असा आरोप आहे.
विशेष म्हणजे, बेकायदेशीर माल सापडूनही कोणताही पंचनामा करण्यात आला नाही, तसेच मालकावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. उलट जप्त केलेला माल ताब्यात घेऊन “माल विकताना सावधगिरी बाळग” असा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण घटनेमुळे संबंधित अधिकारी खरे पोलीस होते की तोतये, याबाबत संशय निर्माण झाला असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.