कोल्हापूर : चेनस्नॅचिंगसह जबरी चोरीचे ६० पेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भात धुमाकूळ घातलेल्या दोन कुख्यात आंतरराज्य चेनस्नॅचर्सना कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वैभव नारायण आडोळे (२६, रा. मूळ येरला, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडी, पुणे) व करण गोरख जगधने (१९, मूळ पिंपळवाडी पिराची, संभाजीनगर, सध्या रा. औंध गावठाण, ता. हवेली, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. चोरट्यांकडून १० तोळे दागिन्यांसह १४ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या चौकशीत चोरट्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ६, सिंधुदुर्ग ३, सांगली २, कराडमधील १ अशा १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, इचलकरंजी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, सांगली शहर, विश्रामबाग, कराड येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र व सीमाभागातील चेनस्नॅचिंगचे अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. सहायक निरीक्षक संतोष गळवेसह पथकाने पुण्यात १० दिवस वेशांतर करून चोरट्यांचा माग काढला. पोलिसांना चकवा देत पसार झालेल्या चोरट्यांचा पाठलाग करून शिरवळ (खंडाळा) येथील एका हॉटेलजवळ बेड्या ठोकण्यात आल्या. चोरट्यांकडून १०० ग्रॅम सोने, दोन दुचाकींसह साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.