कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत होत असताना शहर, जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, यासाठी पोलिस दलाने बुधवारी खबरदारी घेतली. दुपारनंतर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर होता. 35 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणाऱ्या 135 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत चौकाचौकांत पोलिसांचा कडक पहारा होता.
महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापूर व इचलकरंजी परिसरात आचारसंहिता जारी असल्याने शांतता-सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिस दलाने खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यांतर्गत पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलिस बुधवारी दुपारपासून बंदोबस्तासाठी होते.
शिवाजी पूल, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका कॉर्नर, कोंडा ओळ, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, मिरजकर तिकटी, ताराराणी चौक, तावडे हॉटेल, सायबर चौक, शेंडा पार्क, हॉकी स्टेडियम चौक, संभाजीनगर, शिये नाका, टेंबलाईवाडीसह अन्य महामार्गावर पंचगंगा पूल, सांगली फाटा, उजळाईवाडी उड्डाणपूल परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मध्यरात्रीपर्यंत वाहनांची तपासणी करण्यात येत होती. जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरीसह करवीर पोलिस ठाण्यांच्या यंत्रणेमार्फत ठिकठिकाणी दुचाकीस्वारासह मोटार चालकांची तपासणी करीत होते. मद्यधुंद अवस्थेत वाहने हाकणाऱ्या 135 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संबंधितांकडून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले.
शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कण्हेरकर, संतोष डोके, सतिश होडगर, किरण लोंढे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी, पोलिसांचा हालचालींवर वॉच होता. शहरातील काही भागांत रात्री उशिरा कोम्बिंग ऑपरेशनही करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फतही गोवा बनावटीची दारू तस्करी रोखण्यासाठी व्यापक मोहीम राबविली. दोन-तीन दिवसांत झालेल्या कारवाईत 9 जणांवर गुन्हे दाखल झाले असून 24 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले.